Nagpur News, 25 Sep : नागपूर विभागाचा पदवीधर मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. नोंदणी प्रमुख म्हणून माजी आमदार सुधाकर कोहळे यांची निवड केली आहे. जो नोंदणी प्रमुख तोच उमेदवार असे सूत्र भाजपाचे ठरले आहे.
असे असले तरी निवडणुकीच्या राजकारणात शेवटपर्यंत काही सांगता येत नाही. यापूर्वी भाजपने एका नोंदणी प्रमुखाला शेवटच्या क्षणी धक्का दिला होता. अलीकडे एका रेडिमेड आमदारालाच पदवीधरसाठी आयात करण्याच्या हालचाली भाजपात सुरू होत्या. त्यामुळे मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती.
त्यानंतर बाहेरचा कोणी येऊ नये याची खबरदारी घेताना भाजपचे काही नेते दिसत आहेत. याकरिता जमेल त्या ठिकाणी आमचा उमेदवार ठरला असे सांगितले जात आहे. राज्याचे महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांनी एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या तोंडून संभाव्य उमेदवार म्हणून कोहळे यांचे नाव वदवून घेतले आहे. यावरून भाजपात धाकधूक कायम असल्याचे दिसून येते.
नागपूर विभागीत पदवीधर मतदारसंघ भाजपसाठी प्रतिष्ठेचा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ते याच मतरसंघातून ते निवडून आले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. 1995 मध्ये भाजप-सेना युतीची सत्ता असताना ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी हा मतदारसंघ सोडला. नंतर नागपूर लोकसभेची निवडणूक लढवून त्यांनी संसदेत पाऊल ठेवले. गडकरी यांच्यानंतर भाजपचे अनिल सोले हे या मतदारसंघातून निवडून आले होते. ते गडकरी यांचे समर्थक आहेत. त्यावेळी माजी महापौर आणि विद्यमान विधान परिषदेचे सदस्य संदीप जोशी यांना भाजपने नोंदणी प्रमुख केले होते. मात्र उमेदवार म्हणून सोले यांचे जाहीर करण्यात आले.
सोले निवडून आले. त्यामुळे पुन्हा त्यांना एक संधी दिली जाईल असे सर्वांना वाटत होते. मात्र भाजपने धक्कातंत्राचा वापर केला. त्यांच्या ऐवजी संदीप जोशी यांना उमेदवारी दिली. जोशी विरुद्ध महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी असा समाना रंगला होता. मात्र या निवडणुकीत भाजपला आपला परंपरातगत मतदारसंघ गमवावा लागला. वर्षभरानंतर पदवीधरची निवडणूक होऊ घातली आहे.
भाजपला आपला मतदारसंघ पुन्हा खेचून आणायचा आहे. उमेदवार म्हणून सुधाकर कोहळे यांचे नाव आघाडीवर आहे. कोहळे दक्षिण नागपूर विधानसभेचे आमदार होते. त्यानंतर पाच वर्षे त्यांना भाजपने ब्रेक दिला होता. त्यामुळे नाराज झालेल्या कोहळे यांना प्रदेशाध्यक्ष होताच बावनकुळे यांनी नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष करून पुन्हा सक्रिय केले होते.
वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी दक्षिण ऐवजी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी पाठवले होते. मात्र त्यांना याचे विजयात रूपांतर करता आले नाही. नागपूर शहरात भाजपचे वाडा आणि बंगला असे दोन सत्ता केंद्र आहे. त्यात कुणाचा गेम होईल हे सांगता येत नसल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.