Nagpur News: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं होमग्राऊंड असलेल्या नागपूरमध्येच विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपसमोर बंडखोरीचं आव्हान उभं राहिलं होतं. भाजपचे नेते अनिल सोलेंनी उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यातच भाजपच्या गिरीष व्यास यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देत सोलेंना जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पदवीधरमधील बंडखोरी रोखण्यासाठी आपल्या हातात सूत्रे घेतली अन् काही वेळातच गेम फिरला.
देवेंद्र फडणवीस आणि नागपूर पदवीधर निवडणुकीतील बंडखोर अपक्ष अनिल सोले यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. यावेळी त्यांनी सोले यांची बाजू ऐकून घेताना त्यांची नाराजीही दूर केली. सोले हे भाजपमधील मोठं प्रस्थ असून केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या ते अत्यंत जवळचे म्हणून परिचित आहेत.त्यामुळे त्यांची नागपूर पदवीधरमधील नाराजी भाजपच्या पथ्यावर पडणारी नव्हती.
मुख्यमंत्री, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी (ता.12) रात्री थेट अपक्ष उमेदवार अनिल सोले यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ बंद दरवाजाआड चर्चा झाली. भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या सोले यांनी बंडखोरी केली होती.
मात्र, मुख्यमंत्री फडणवीसांसोबत झालेल्या भेटीनंतर अनिल सोले यांनी माध्यमांशी बोलताना नागपूर पदवीधरच्या निवडणुकीतून आपण उमेदवारी मागे घेत असल्याची जाहीर केलं. तसेच त्यांनी आपला राजीनामाही मागे घेतला आहे. यावेळी सोले यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच सुधाकर कोहळे यांना निवडून आणण्याचा निर्णय घेतला आहे.
याचदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश व्यास यांनीही त्यांचा राजीनामा मागे घेतला असल्याचं स्पष्ट केलं आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, अनिल सोले यांची पक्षावर नाराजी नव्हती, तर कार्यपद्धतीवर होती. आम्ही त्यांच्या मागणीनुसार, जे भाजपचे जुने कार्यकर्ते,जे मेन स्ट्रीमपासून दूर गेले आहेत. त्यांना पुन्हा एकदा आम्ही पक्षात काम देण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अनिल सोले यांच्याकडून राहून गेली एक महत्त्वाची गोष्ट माध्यमांसमोर उघड केली. ते म्हणाले, आमचे जे पदवीधरचे उमेदवार आहेत, ते सुधाकर कोहळेही सोले सरांचेच विद्यार्थी आहेत. त्यामुळे आता यापुढे अनिल सोले हेच प्रचाराची धुरा हाती घेतील,असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
तर अनिल सोले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कामासाठी माझ्या घरी आले ही माझ्यासाठी चांगली गोष्ट नक्कीच नाही. एवढी वर्षे मी पक्ष वाढवण्याचं काम केलं,आज सतिश डोहन साहेब आले, त्यांची पहिली एन्ट्री होती. माझी त्यांच्याशी ओळख होती. गडकरी साहेबांनी विनंती केली होती, तू देवेंद्र यांच्याशी बोलून सगळं मान्य कर.असे अनेक कार्यकर्ते ज्यांचे,फार वय झालेलं नाही. त्या कार्यकर्त्यांना आता काम दिले जाणार आहे.त्यांना मुख्य प्रवाहात आणले जाईल असंही आश्वासन मला देवेंद्रजी यांनी दिल्यानं माघार घेत असल्याचंही सोले यांनी सांगितलं.