Nitesh Karale, Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

Nagpur Election News: पुन्हा राष्ट्रवादी की भाजप..? नागपूर पदवीधरमध्ये 'किंगमेकर' ठरलेल्या नितेश कराळेंनी पुढचा राजकीय प्लॅनच सांगितला

Nitesh Karale Political News: सत्ताधारी पक्ष म्हणून सगळी यंत्रणा कामाला लावून अन् मुख्यमंत्री, इतर मंत्र्यांनी ताकद लावूनही नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपला जिंकता आलाच नाही. तर दुसरीकडे भाजपच्या पराभवात आणि काँग्रेसच्या अभिजीत वंजारींच्या विजयात मोठा वाटा उचलणाऱ्या अपक्ष उमेदवार नितेश कराळेंनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे.

Deepak Kulkarni

Nagpur News: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत सर्वाधिक अटीतटीची लढत आणि धक्कादायक निकालाची नोंद नागपूरमध्ये झाली. अखेरच्या टप्प्यांपर्यंत नेमकं कोण जिंकणार हे सांगणं कठीण झालं होतं. सत्ताधारी पक्ष म्हणून सगळी यंत्रणा कामाला लावून अन् मुख्यमंत्री, इतर मंत्र्यांनी ताकद लावूनही नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपला जिंकता आलाच नाही. तर दुसरीकडे भाजपच्या पराभवात आणि काँग्रेसच्या अभिजीत वंजारींच्या विजयात मोठा वाटा उचलणाऱ्या अपक्ष उमेदवार नितेश कराळेंनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत 25000 मतं मिळवलेल्या नितेश कराळे मास्तर यांची पुढची राजकीय वाटचाल कशी असणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. कारण महाविकास आघाडीतून विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधरमधील बंडखोरीनंतर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या निकालात आपली ताकद दाखवून दिल्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीसोबत जाणार की नवी राजकीय वाट धरणार याविषयी आता त्यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

नितेश कराळे यांनी आपण यापुढे शरद पवारांसोबत परत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ते माझे आदर्श आहेत. मला त्यांच्यासोबत फिरता आलं हे माझं भाग्य आहे. त्यांच्याविषयी मानसन्मान आहे आणि पवारांकडून खूपकाही राजकारण शिकायला मिळालं आहे. पण आपण परत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात परतणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच त्यांनी माझं वेगळं अस्तित्व दाखवून दिलं आहे. पुढेही निवडणुका असून त्यावर आपलं लक्ष असल्याचंही कराळेंनीही सांगितलं.

नागपूर पदवीधर निवडणुकीतील गेमचेंजर ठरल्यानंतर नितेश कराळेंना भविष्यात भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर आली तर तुम्ही काय निर्णय घेणार असा प्रश्न विचारण्यात आला.त्यावर मी कधीही भाजपसोबत जाणार नसल्याचंही जाहीर केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री बोलवणार असतील तरीही आपण भाजपमध्ये कधीच जाणार नाही,अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली.

नितेश कराळे म्हणाले, मी शिव-शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे पाईक असून आम्ही भाजपसोबत जाऊच शकत नसल्याचंही म्हटलं आहे. आणि जरी भाजपमध्ये प्रवेश केला तरी तर तिथेही शिव-फुले-शाहु-आंबेडकरांचा झेंडा गाडल्याशिवाय राहणार नाही, असंही कराळे यांनी ठणकावून सांगितलं.

नितेश कराळेंनी यावेळी ‘मला 25 हजार मतदान मिळालं, जवळपास 7 ते 8 हजार मतं इनव्हॅलिड झाली; ती ग्राह्य धरली असती तर माझं मतदान 34 ते 35 हजारांच्या आसपास गेलं असतं,’ असंही मोठं विधान कराळे मास्तर यांनी केलं. विशेष म्हणजे एकाही मतदाराला पैसे दिले नाहीत, मटनाची पार्टी किंवा दारू पाजली नाही, असा दावा करत हे मतदान समर्थकांच्या प्रेमातून मिळाल्याचं त्यांनी म्हटलं.

यावेळी नितेश कराळे म्हणाले, मी किंगमेकर बनलो आहे. मला बीजेपी आणि काँग्रेसनं खूप हलक्यात घेतलं होतं. त्यांना वाटायचं, मला हार्डली चार-पाच हजार मतदान मिळेल, पण मला लोकांनी भरघोस मतदान केलं. मी लोकांचं काम करत होतो. त्यामुळे आपल्या अंगावर 100 च्या वर केसेस आहेत. मला फॉर्म भरताना ८ दिवस लागले. या केस लोकांचे प्रश्न रस्त्यावर मांडताना लागल्या आहेत. मी निवडणुकीआधी पंधरा दिवस जेलमध्ये राहिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT