

Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागासाठी नुकतीच मतमोजणी पार पडली. या निकालात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. विशेषतः भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या नागपूर व पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीत पाच पैकी तीन जागा महाविकास आघाडीला मिळाल्या तर दोन जागा महायुतीला मिळाल्या आहेत. राज्यात सत्ता असताना महायुतीला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर महायुतीमधील मित्रपक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पदवीधर मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.
त्यासोबतच नागपूर व छत्रपती संभाजीनगर पदवीधरमध्ये ही महायुतीला पराभव स्वीकारावा लागल्याने अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे आता भाजपकडून आमदार व नगरसेवकांची येत्या एक दोन दिवसात झाडाझडती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेणार आहेत. त्यानंतर 2 नोव्हेंबरला दिल्ली दरबारी जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे भाजपच्या बालेकिल्ल्यात झालेल्या पराभवाबाबत दिल्ली दरबारी अहवाल सादर करणार आहेत.
विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होताच महायुतीमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. विशेषतः नागपूर व पुणे बालेकिल्ल्यातील पराभव भाजपच्या (BJP) जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच आता महायुतीमधील मित्रपक्षांनी पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या दोन मतदारसंघातील पराभवानंतर भाजपने आता आत्मचिंतन करण्याचे ठरवले असून त्यासाठी पुण्यातील आमदार व नगरसेवकांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत पराभवाचे कारण शोधण्याचा प्रयत्न असणार आहे.
विधान परिषद निवडणुकीत विशेषतः पदवीधरच्या पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या तीन ही मतदारसंघात महायुतीला यश मिळालेले नाही तर दुसरीकडे दोन्ही शिक्षक मतदारसंघात पुणे शिक्षकची जागा भाजपला मिळाली तर अमरावती शिक्षकची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (shivsena) मिळेलेली आहे. त्यामुळेच पदवीधरमधील पराभवाचे खापर महायुतीमधील मित्रपक्षाकडून एकमेकांवर फोडले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.
गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच महायुतीला पराभवाला सामोरे जावे लागले असल्याने या पराभवाच्या धक्कयानंतर महायुती खडबडून जागी झाली आहे. विशेषतः नागपूर व पुणे पदवीधर मतदारसंघ गेल्या निवडणुकीचा अपवाद वगळता यापूर्वी भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र 2020 मध्ये राज्यात असघडी सरकार असल्याचा फायदा त्यावेळी महाविकास आघाडीला झाला होता. त्यावेळी पाच पैकी चार जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते.
यावेळेस राज्यात महायुतीची सत्ता असून आतापर्यंत विधानसभा निवडणुकीपासून महायुतीचा सातत्याने विजय होत आहे. त्यानंतर झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत व महापालिका व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्थानिकच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली होती. त्यानंतर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतही महायुतीने वर्चस्व मिळवले होते. त्यामुळे दोन दिवसापूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळेल, अशी अपेक्षा होती.
या निवडणुकीत मात्र, महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. या दोन्ही पक्षाला पदवीधरच्या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. त्याचमुळे भाजपने शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे त्यामुळे आता भाजपकडून पुणे व नागपूर पदवीधर मतदारसंघातील आमदार व नगरसेवकांची येत्या एक दोन दिवसात झाडाझडती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेणार आहेत. त्यानंतर 2 नोव्हेंबरला दिल्ली दरबारी जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे भाजपच्या बालेकिल्ल्यात झालेल्या पराभवाबाबत अहवाल सादर करणार आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी दिल्लीतील हायकंमाडकडून कोणती पावले उचलली जाणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.