Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule: नागपूरमध्ये भाजपला पक्षातूनच दगाफटका? 8500 मतपत्रिकांवरील ‘2’च्या घोळामुळे संशय; बावनकुळेंनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली!

Nagpur Graduate Election: नागपूर पदवीधर निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर साडेआठ हजार मतपत्रिकांवरील ‘2’च्या नोंदींची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Graduate Constituency: नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या पराभवाने पक्षांतर्गत खळबळ उडाली आहे. या पराभवामागे पक्षातील अंतर्गत नाराजी आणि संभाव्य घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कोहळे यांच्या नावासमोर सुमारे साडेआठ हजार मतपत्रिकांवर ‘२’ हा आकडा नोंदविला होता. हा प्रकार मतदारांकडून झालेली चूक होती की जाणीवपूर्वक घडवून आलेली कृती असा संशय भाजपच्या अंतर्गत वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

या निवडणुकीत सुमारे दोन लाख ५५ हजार नोंदणीकृत मतदारांपैकी एक लाख ६५ हजार मतदारांनी मतदान केले. मतमोजणीदरम्यान सुमारे १५ हजार मते अवैध ठरली. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोहळे यांनी सुमारे पाच हजार मतांची आघाडी घेतली होती. मात्र, अंतिम निकालात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे अवैध मतांचे प्रमाण आणि मतपत्रिकांवरील नोंदींचे स्वरूप याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

कोहळे यांच्या नावासमोर ‘२’ हा आकडा नोंदविलेल्या मतपत्रिकांची संख्या मोठी असल्याचा दावा केला जात आहे. हा प्रकार मतदारांकडून झालेली चूक होती की जाणीवपूर्वक घडवून आलेली कृती, याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित नोंदींमुळेच मतपत्रिका अवैध ठरल्या का?, हेही निवडणूक नियम आणि अधिकृत कागदपत्रांच्या पडताळणीतून स्पष्ट होईल. या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश पक्षाच्या वरिष्ठांनी दिल्याची माहिती पुढे आलेली आहे.

निकालावरून तर्कवितर्क

उमेदवारीवरून भाजपमध्ये सुरुवातीपासूनच नाराजी असल्याची चर्चा होती. माजी आमदार प्रा. अनिल सोले यांची भूमिका आणि गिरीश व्यास यांच्या समर्थकांमधील असंतोषामुळे पक्षातील अंतर्गत मतभेदांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या नाराजीचा निकालावर परिणाम झाला का?, याबाबतही तर्कवितर्क सुरू आहेत.

मतपत्रिकांवरील संशयास्पद नोंदींची सत्यता, अवैध मतांची कारणे आणि कथित घातपातामागील वस्तुस्थिती अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात कोण जबाबदार ठरणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

'पराभवाची जबाबदारी माझीच' : चंद्रशेखर बावनकुळे

दुसऱ्या बाजूला नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी पक्षाचे निवडणूक प्रभारी आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वीकारली आहे. आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी आत्मचिंतनावर भर दिल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ही जागा तशी काँग्रेसकडे होती आणि पुणे देखील आमच्याकडे नव्हती. त्यामुळे दोन्ही जागा जिंकण्यासाठी पक्षाने पूर्ण ताकद लावली होती.

पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत संपर्क साधला आणि मेहनतही घेतली. मात्र, अपेक्षित यश मिळाले नाही. याचा अर्थ कुठे ना कुठे काहीतरी कमी पडले आहे. या निवडणुकीत मी स्वतः प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळत होतो. त्यामुळे नागपूरमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. प्रत्येक मतदारसंघातील घडामोडींचा अभ्यास करून पराभवाची कारणे शोधली जातील. या चिंतनावरून भविष्यात ही जागा नक्की जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पदवीधर मतदारांच्या अपेक्षा समजून घेऊ

"हा मतदारसंघ भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा होता. सुरुवातीपासूनच यावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. हा निकाल पक्षासाठी आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे. पराभवाची कारणे समजून न घेता पुढे जाणे योग्य नाही. त्यामुळे संघटनेच्या कामकाजात कुठे सुधारणा हवी आहे, मतदारांशी संपर्क कसा वाढवायचा आणि पदवीधर मतदारांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, याचा सखोल अभ्यास केला जाईल", असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT