Nagpur Hit and Run Case Sarkarnama
विदर्भ

Nagpur Hit and Run Case: संकेत बावनकुळेलाही निंबध लिहायला सांगून सोडणार का? ठाकरे गटाच्या नेत्या कडाडल्या

Rajesh Charpe

Nagpur: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ऑडीकार अपघातावरून ठाकरे गटाने भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषाम अंधारे नागपुरात आल्या आहेत. त्यांनी पोलिस ठाण्याला भेट दिली.

संकेत बावनकुळे याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार नसेल तर आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करू असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे ऑडीकार प्रकरण विधानसभेच्या निवडणुकीत चांगलेच तापवले जाणार असल्याचे दिसते. यावेळी त्यांनी पुण्यातील पोर्शेकार अपघात प्रकरणाप्रमाणे संकेत बावनकुळे यालाही निंबध लिहायला लावून सोडून देणार का असा सवाल उपस्थित केला.

रविवारी मध्यरात्री संकेत बावनकुळे व त्याच्या मित्राच्या ऑडीकारने चार ते पाच कारला धडक दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.दोघांनी मद्य सेवन केले होते. पण संकेत बावनकुळे हा गाडीतच नव्हता त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही. त्याची वैद्यकीय तपासणी केली नाही, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवर विश्वास नाही. याची खातरजमा करण्यासाठी स्वतः सुषमा अंधारे नागपुरात आल्या आहे. त्यांनी या प्रकरणी फडणवीस, बावनकुळे आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले.

सुषमा अंधारे यांनी एफआयआरमध्ये नाव नाही तर चौकशी कशी होणार, संकेत बारमध्ये मसाला दूध प्यायला गेला होता का, अपघात झाला असेल तर तो कार चालवत नसेल परंतु त्यात बसलेल्यांवर गुन्हा दाखल होतो की नाही,आरोपींना ताब्यात घेतले त्याच दिवशी गाडी ताब्यात घेतली का नाही, गाडीचे डिटेल एफआयआरमध्ये का नाही, वैद्यकीय चाचणीसाठी केवळ दोघांना का पाठवले, संकेतचे मेडिकल का केले नाही असे प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केले आहे.

पोलिसांवर भाजपचा दबाव आहे. त्यामुळेच संकेत बावनकुळे याच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही. ज्या जितेंद्र सोनकांबळे याने तक्रार नोंदवली त्याच्यावरही तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलिसांवरही गुन्हे दाखल करावे, अशी मागणी त्यांनी केली. नागपुरात ३५०० सीसीटीव्ही आहेत,त्यातून जे आम्हाला पाहिजे तेच गायब असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

फडणवीस, आणखी पाच पन्नास मरु द्या...

राज्यात एवढेसारे प्रकरणे घडत असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची गरज नाही. आणखी पाच पन्नास मरु द्या, असा टोलाही त्यांनी लगावला. पुण्यातील पोर्शेकार अपघातातील अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी निबंध लिहायला सांगितले होते. आता गृहमंत्र्यांच्या शहरात आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या मुलालाही पाच पानांचा निबंध लिहायला सांगा, असे म्हणून सुषमा अंधारे यांनी पोलिसांवरही टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT