Nagpur students seek help from CM: उकाड्यात कुलरची मागणी सामाजिक न्याय विभागाच्या बेसा येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
मात्र मुख्यमत्र्यांकडे का तक्रार केली, या कारणामुळे विद्यार्थिनी आकांक्षा उकेला वसतिगृह सोडण्यासाठी नोटीस वसतिगृहाचे गृहपाल यांनी बजावली. मात्र पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तिच्या मदतीला धावून आले. यामुळे वस्तीगृहातून काढण्याची नोटीस रद्द करण्यात आली.
आकांक्षा ही एमबीएच्या प्रथम वर्षाला आहे. बेसा येथील वसतिगृहात अडीचशे मुली राहतात. नागपुरातील प्रचंड उकाडा लक्षात घेता त्यांनी कुलरची मागणी केली. मात्र वॉर्डन कल्पना पाटील यांनी कुलरची सोय करता येत नाही, असे थेट उत्तर दिले. यामुळे येथील ८२ मुलींनी पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुलींच्या सर्व वसतिगृहात कुलरची सोय करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले व अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
एप्रिलमध्ये आकांक्षा आणि इतर मुली राहात असलेल्या खोलीचा फॅन बंद पडला होता. तो सुरू करण्याची तक्रार गृहपालाकडे दिल्यानंतर आठ दिवसानंतर फॅन सुधारण्यासाठी इलेक्ट्रिशियन आला. विशेष असे की, एक फॅन सुधारण्यासाठी इलेक्ट्रीशियन येत नाही, असेही वॉर्डनने सुनावले होते, असे इतर मुलींनी सांगितले.
आकांक्षा उके ही नेतृत्व करीत होती, असा समज करून सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेसा येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहातून तिला बाहेर काढण्यासाठी नोटीस बजावली.
एवढ्यावरच हे अधिकारी थांबले नाहीत, तर आकांक्षा नोकरी करीत असल्याचे कारण पुढे करून वसतिगृहात भोजन आणि निवासाचा एकूण २२ हजार ४९८ रुपये दंड भरण्यात यावा असे नोटीशीतून बजावले.
यामुळे आकांक्षा घाबरली. आकांक्षा नोकरी करीत नसून ती एमबीए अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणार्थी (ट्रेनिग) म्हणून काम करते. मात्र अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी धारेवर धरल्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी जणू बदलाच घेत असल्याचा संशय येतो.
आकांक्षा उकेला नोटीस बजावल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कळले. त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत तिला फोन करून वसतिगृह सोडण्याची अजिबात गरज नाही, काही अडचण असेल तर मला फोन कर, तुझ्या पाठीशी सरकार आहे, असा धीर दिला. यामुळे तिला दिलासा मिळाला.
या प्रकरणाची माहिती मिळताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने हस्तक्षेप करत तिला फोन करून तीला धीर दिला. आकांक्षा सोबत स्वतः संवाद साधला असून तिचे अनुभव ऐकले आहेत. हे प्रकरण गंभीर असून समाजकल्याण मंत्र्यांशी चर्चा करून संबंधित अधिकारी आणि वॉर्डनवर योग्य कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.