Nitin Gadkari, Vikas Thakre and Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Nagpur Lok Sabha Election : वंचितचा पाठिंबा मिळवून काँग्रेसने टाकले एक पाऊल पुढे !

Nitin Gadkari : मागील निवडणुकीत वंचितचे उमेदवार सागर डबरासे यांनी सुमारे २६ हजार मते घेतली होती. वंचितकडे जाणारी मते ही काँग्रेसची मानली जातात. ती थेट काँग्रेस उमेदवाराकडे वळती झाल्यास गडकरींच्या मताधिक्यामध्ये घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Lok Sabha Election : निवडणुकीत केव्हा काय होईल, हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. यावेळची लोकसभा निवडणूक अनिश्‍चिततेने भरलेली दिसून येत आहे. रामटेकमध्ये भाजपने काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांना महायुतीमध्ये घेऊन शिंदे गटाकडून उमेदवारी दिली. इकडे नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार न देता काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला. याचा फटका थेट भाजपला बसण्याची शक्यता आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने या वेळी महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा जाहीर करून थेट भाजपलाच आव्हान दिले आहे. नागपूरमध्ये उमेदवार देण्यात आला नसल्‍याने याचा फटका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बसण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या कृतीने आपण भाजपची ‘बी टीम’ आहोत, हा मुद्दाही वंचितने खोडून काढला आहे.

प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीत अनेक दिवसांपासून वाटाघाटी सुरू आहेत. मात्र, अद्यापही जागावाटपाचे सूत्र ठरलेले नाही. त्यामुळे वंचित नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आंबेडकरांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष तसेच पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांना पाठिंबा जाहीर करून भाजपला मोठा धक्का दिला आहे. वंचितचा पाठिंबा मिळवून काँग्रेसने प्रचाराच्या पहिल्याच फेरीत भाजपला मात दिली असल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नितीन गडकरी यांनी पाच लाखांच्या मताधिक्याने आपण निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. मागील निवडणुकीच वंचितचे उमेदवार सागर डबरासे यांनी सुमारे २६ हजार मते घेतली होती. वंचितकडे जाणारी मते ही काँग्रेसची मानली जातात. ती थेट काँग्रेस उमेदवाराकडे वळती झाल्यास गडकरींच्या मताधिक्यामध्ये घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०१९च्या निवडणुकीत वंचित बहुजन विकास आघाडीने महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले होते. याचा फटका अनेक काँग्रेसच्या दिग्गज उमेदवारांना बसला होता.

माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात स्वतः प्रकाश आंबेडकर लढले होते. शिंदेसह चंद्रपूरचा उमेदवार वगळता काँग्रेसचे सर्वच उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळे या वेळी प्रकाश आंबेडकर यांना सुरुवातीपासूनच सोबत घेण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरवले होते. मात्र, अद्यापही त्यांच्या वाटाघाटीला फारसे यश आले नाही. वंचितने रामटेक लोकसभा मतदारसंघाचाही निर्णय राखून ठेवला असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी आज (ता. 27) सकाळी अकोला येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

थोड्या वेळापूर्वी काँग्रेसचे २०१९मधील रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार किशोर गजभिये हे नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले असल्याची माहिती आहे. त्यामुळे वंचितचे रामटेकच्या बाबतीत नेमके धोरण काय, हे समजण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, भाजपचे माजी जि.प. सदस्य शंकर चहांदे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT