Sarkarnama
विदर्भ

Nagpur Mahapalika : 9 वर्षांपूर्वी 15 दिवसांत द्यावा लागला होता राजीनामा; काँग्रेस नेत्याने आमदार होऊन समर्थकाला पुन्हा त्याच खुर्चीत बसवलं!

Nagpur Municipal Corporation : नागपूर महापालिकेत काँग्रेसने संजय महाकाळकर यांची पुन्हा गटनेतेपदी निवड करत, आमदार विकास ठाकरे यांच्या वाढत्या प्रभावामुळे बदललेले राजकीय समीकरण स्पष्ट केले.

Rajesh Charpe

Nagpur News : काँग्रसने महापालिकेचा गटनेता म्हणून नगरसेवक संजय महाकाळकर यांची एकमताने निवड केली. तशी नोंदणीही काँग्रेसने आज विभागीय आयुक्तालायत केली. तेच आता विरोधीपक्ष नेतेही राहणार आहेत. काँग्रेसने आता आपले संख्याबळ वाढवून एक नामनिर्देशित सदस्य करण्यासाठी मुस्लीम लीगलाही सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र लिगने आपल्या चार नगरसेवकांची आधीच नोंदणी केली आहे.

यावेळी भाजपचे 102 तर काँग्रेसचे 33 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधातच बसावे लागणार आहे. मागील कार्यकाळात संजय महाकाळकर यांची काँग्रेसचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांच्या नावाला इतर नगरसेवकांनी विरोध केला होता. त्यात अनेक ज्येष्ठ नगरसेवकांचा समावेश होता. सर्वांनी एकत्र येत विभागीय आयुक्तालयात स्वतंत्रपणे गटाची नोंदणी केली होती.

त्यामुळे महाकाळकर यांची पंधरा दिवसाच्या आताच खुर्ची गेली होती. त्यानंतर तानाजी वणवे यांना विरोधीपक्ष नेतेपद बहाल करावे लागले होते. त्यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांना नामनिर्देशित नगरसेवक करण्यात येणार होते. ठाकरे यांना महापालिकेत येण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसचा एक गट सक्रिय झाला होता. 28 नगरसेवकांच्या काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. आता राजकीय चित्र बदलले आहे. विकास ठाकरे आमदार झाले. मात्र त्यांच्याकडे काँग्रेसचे शहराध्यक्षपद कायम आहे.

त्यांना रोखण्यासाठी पुढाकार घेतलेले नगरसेवक पराभूत झाले आहेत. काँग्रेसचे माजी गटनेते तानाजी वणवे पराभूत झाले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव प्रफुल गुडधे यावेळी निवडणूक लढले नाहीत. त्यांच्या पत्नी निवडून आल्या आहेत. मागील आठ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. गुडधे यांचा ठाकरे विरोधी सूर मावळला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत तयांनी ठाकरे यांचा प्रचार केला. गुडधे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दक्षिण-पश्चिम नागपूरमधून काँग्रेसने उमेदवारी दिली होती.

याशिवाय काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी सक्रिय राजकारणातून बाहेर पडले आहेत. आमदार नितीन राऊत हे फक्त आपल्या उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात लक्ष घालत आहे. चारदोनचा अपवाद वगळता काँग्रेसचे सर्वच नगरसेवक नवे आहेत. प्रमुख दावेदार असलेले प्रशांत धवड आणि सतीश होले हे पराभूत झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT