Nagpur Mayor News Sarkarnama
विदर्भ

Nagpur Mayor News: फडणवीस, गडकरींच्या होमटाऊनमध्ये महिलाराज; महापालिकेची तिजोरीसुद्धा ताब्यात

Nagpur Municipal Corporation mayor election: नागपूर महापालिकेत भाजपचे सर्वाधिक १०२ नगरसेवक निवडून आले आहेत. आरक्षणाच्या सोडतीत महापौरपद महिलेसाठी राखीव झाले आहे. तेव्हापासून महापौर कोणाला करणार याविषयी वेगवेगळ्या नावाची चर्चा सुरू होती.

Rajesh Charpe

Nagpur News: मागील पंधरा दिवसांपासून नागपूर शहराचा महापौर कोण होणार यावरच पडदा आज बाजूला सारण्यात आला. भाजपने ज्येष्ठ नगरसेविका नीता ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली असून उपमहापौर आणि स्थायी समितीचे सभापतीही जाहीर केले.

विशेष म्हणजे महापालिकेतील तीनही महत्त्वाची पदे यावेळी भाजपने महिलेला दिली आहेत. उपमहापौर म्हणून लीला हातीबेड तर स्थायी समितीच्या सभापतिपदी शिवानी दाणी यांची नावे जाहीर भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी जाहीर केली.

नागपूर महापालिकेत भाजपचे सर्वाधिक १०२ नगरसेवक निवडून आले आहेत. आरक्षणाच्या सोडतीत महापौरपद महिलेसाठी राखीव झाले आहे. तेव्हापासून महापौर कोणाला करणार याविषयी वेगवेगळ्या नावाची चर्चा सुरू होती.

भाजपनेही कालपर्यंत हे नाव गुलदस्त्यात ठेवले होते. ज्या नावांची चर्चा होती त्यात नीता ठाकरे, शिवानी दाणी आणि दिव्या धुरडे यांचा समावेश होता. यातून नीता ठाकरे यांची निवड करण्यात आली. नीता ठाकरे दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रभागातून निवडून आल्या आहेत. दक्षिण नागपूर मागील वीस वर्षांत महापौरपद देण्यात आले नव्हते. दक्षिणचे आमदार मोहन मते यांनी यावेळी दक्षिण नागपूरचा महापौर देण्यात यावा अशी आग्रही मागणी पक्षाच्या बैठकीत केली होती.

महापौरपदाच्या स्पर्धेत असलेल्या शिवानी दानी यांना स्थायी समितीचे सभापतिपद देण्यात आले आहे. त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रभागातून त्या निवडून आल्या आहेत. दाणी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या गुंतवणूक सल्लागार म्हणून यापूर्वीच नियुक्ती केली आहे. शिवाणी या प्रथमच निवडून आल्या आहेत. असे असताना महापालिकेची तिजोरी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

भाजपचे संजय बालपांडे यांना उपमहापौर करण्याचे ठरवले होते. मात्र हे पद शोभेचे असल्याने बालपांडे यांनी नकार दिल्याचे समोर आले आहे. त्यांना स्थायी समितीचे सभापतिपद हवे होते. त्याच्या नकारानंतर भाजपच लीला हातीबेड यांना उपमहापौर करण्याचा निर्णय घेतला. चार दिवसांपूर्वी भाजपने नरेंद्र बोरकर यांची सत्तापक्ष नेते म्हणून नियुक्ती केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT