Nagpur Municipal Corporation Sarkarnama
विदर्भ

Nagpur Municipal Election 2025: नव्या आघाड्यामुळे राष्ट्रीय पक्षांची डोकेदुखी वाढणार

Nagpur Municipal Election Third Front Tension for National Parties: स्थानिक राजकारणातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना कोणी विचारत नाही. हे लक्षात घेऊन स्वतंत्र आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या पक्षांच्या भाऊगर्दीत आघाड्यांचे भवितव्य निवडणुकीच्या निकालावरच अवलंबून राहणार आहे.

Rajesh Charpe

Nagpur News: नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मुलाखती, बैठकींचा धडाका लावला आहे. आघाडी आणि युतीच्याही चर्चा जोरात सुरू आहे. भाजप तसेच काँग्रेस पक्षांकडे इच्छुक उमेदवारांच्या रांगा लागल्या आहेत. बडे आणि नेत्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचाच तिकिटासाठी विचार केला जात आहे. सोबतच त्यांच्या नावाचे पॅनेल तिकिटासाठी पाठवण्यात आले आहे. हे बघून दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी आता नव्या आघाड्या तयार करण्यास सुरुवात केली आहे.

नागपूर जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या बहुतांश नगर पंचायतीमध्ये हे चित्र आहे. या आघाड्यांमुळे राष्ट्रीय पक्षांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात १५ नगर पालिका आणि १२ नगर पंचायतीमध्ये निवडणूक जाहीर झाली आहे.

नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायतीमध्ये आघाड्यांचे प्रयोग मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायतींमध्ये खरबी-बहादुरा, येरखेडा, कोंढाळी, डिगडोह, बिडगाव-तरोडी-पांढुर्णा, बेसा-पिपळा या शहराला लागून असलेल्या नगर पंचायतींचा समावेश आहे.

प्रथमच निवडणूक होत असल्याने ही संधी कोणालाच सोडायची नाही. यामुळे परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. भाजप आणि काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचे जवळपास ठरवले आहे. त्यांनी अद्याप आपल्या मित्र पक्षांसोबत चर्चा केली नाही. भाजपने जुजबी चर्चेनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अव्हेरले असल्याचे दिसून येते. त्यामुळे शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने युती करण्याचा निर्णय घेतला आहे. हीच परिस्थिती महाविकास आघाडीची आहे.

काँग्रेसने आपल्या इच्छुकांच्या मुलाखती आटोपल्या. त्याचा अहवालसुद्धा प्रदेशाध्यक्षांकडे सादर केला आहे. काँग्रेसने मित्र पक्ष शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणेही टाळले आहे. उद्धव ठाकरे यांची सेना एकाकी पडली आहे. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीने समविचारी पक्षांची मोट बांधणे सुरू केले आहे. यात उद्धव ठाकरे सेनेसोबत आम आदमी पार्टी, रिपाइंच्या विविध गटांसोबत चर्चा सुरू केली आहे. त्यांची आघाडी जवळपास ठरली आहे.

हे सर्व प्रयत्न पक्षाच्या पातळीवर सुरू असले तरी स्थानिक राजकारणातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना कोणी विचारत नाही. हे लक्षात घेऊन स्वतंत्र आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या पक्षांच्या भाऊगर्दीत आघाड्यांचे भवितव्य निवडणुकीच्या निकालावरच अवलंबून राहणार आहे. मात्र यामुळे मतविभाजनाचा मोठा धोका भाजप आणि काँग्रेसला होऊ शकतो अशी भीती वर्तविली जात आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT