Duneshwar Pethe and Chitra Wagh. Sarkarnama
विदर्भ

Nagpur NCP News : चित्राताईंनाही ‘हे’ चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे, तरीही...

सरकारनामा ब्यूरो

Chitra Wagh has targeted the NCP on this issue : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी छापलेल्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या चित्रावर बोकड आणि मस्जिदचे चित्र छापले गेले आहे. त्यावरून भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. (Bharatiya Janata Yuva Morcha has also given a statement to the police)

उद्या गुरूवारी (ता. २९) या एकाच दिवशी आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन सण आले आहेत. त्यामुळे कॅलेंडरवर ‘२९ जून’ या तारखेच्या रकान्यामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल यांच्या चित्रावर बोकड आणि मस्‍जिदचे चित्र छापले गेले आहे. यावरून भारतीय जनता युवा मोर्चाने पोलिसांना निवेदनही दिले आहे.

भाजयुमोने या कॅलेंडरवर आक्षेप नोंदविला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदन दिले. यामुळं हिंदू धर्मीयांचा अपमान झाल्याचा आरोप भजोयुमोने केला आहे. दुनेश्वर पेठे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या विषयावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘ही आहे राष्ट्रवादी काँग्रेसची असली नियत, थेट माऊली विठ्ठलाच्या चेहऱ्यावरच बोकड..! हे यांचे वारकरी प्रेम..! करावा तेवढा निषेध कमी !’, असे ट्विट त्यांनी केले आहे.

यासंदर्भात दुनेश्‍वर पेठे यांना विचारणा केली असता, विठ्ठलाच्या चित्रावर बोकड आणि मस्जिदचे चित्र छापले गेले, हे खरे आहे. पण असला प्रकार कुणीही जाणीवपूर्वक करणार नाही. मीच काय पण कॅलेंडर छापणाऱ्याला जरी सांगितलं तरी, तो सुद्धा असं करणार नाही. हेतू ठेऊन असे काम करणे शक्यच नाही, असे ते म्हणाले.

चित्रा वाघ या ज्येष्ठ नेत्या आहेत, कधी काळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये काम केले आहे. येथे कुणीही असं करू शकत नाही, हे त्यांनाही चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. तरीही त्यांनी एका छपाईच्या चुकीचे अशा पद्धतीने राजकारणे करावे, याचे दुःख वाटते, असेही दुनेश्‍वर पेठे म्हणाले.

कॅलेंडर छपाईसाठी गेलं तर लक्षात येईल की, कॅलेंडर तेच असतं. केवळ वरचा मथळा बदलला जातो. जेव्हा ही चूक छपाई करणाऱ्याच्या लक्षात आली, तेव्हा त्याने लगेच ती छपाई असलेले कॅलेंडर नष्ट केले आणि छपाई करणाऱ्यानेही दिलगिरी व्यक्त केली आहे. आता कुणाला घाणेरडे राजकारणच (Politics) करायचे असेल, तर त्याला उपाय नाही, असेही पेठे म्हणाले.

ही प्रिंट मिस्टेक असून यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही, यासाठी दिलगिरी व्यक्त करत याचं राजकारण कुणी करू नये, असं आवाहनही पेठे यांनी केलं आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते हेतू ठेऊन ठेऊन काम करतात, असा पलटवारही पेठेंनी केला.

‘एकाच दिवशी दोन सण आल्याने वार्षिक कॅलेंडरमध्ये छपाईदरम्यान अनवधानाने चूक झाली आहे. यात कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. यावरून वारकरी, भक्तांच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो. हा निश्चितच गंभीर विषय असल्याने सणासुदीच्या दिवसात कुणीही यावर राजकारण करू नये, असे नम्र आवाहन आहे.’, असे पत्रकही राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) शहर कार्यालयातर्फे काढण्यात आले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT