Sharad Pawar, Prashant Pawar and Prafull Petel. Sarkarnama
विदर्भ

Nagpur NCP News : शरद पवारांनी उद्घाटन केलेल्या ‘या’ कार्यालयातून चालणार ‘दादा’ गटाचे कामकाज !

सरकारनामा ब्यूरो

Office of Ajit Pawar's NCP in Nagpur News : अजित पवारांनी बंड पुकारल्यानंतर उपराजधानीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन तुकडे झाले. यामध्ये शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे, प्रदेशचे पदाधिकारी शेखर सावरबांधे, प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील या नेत्यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव शहर कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. (Leaders Prashant Pawar, Baba Gujar accompanied Ajit Pawar)

प्रशांत पवार, बाबा गुजर हे नेते अजित पवारांसोबत गेले. शहर कार्यालयावर शरद पवार गटाचा ताबा आहे. त्यामुळे आता अजित दादा गटाचा कारभार प्रशांत पवार यांच्या बजाजनगर येथील कार्यालयातून चालणार आहे, असे प्रशांत पवार यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) नागपूरचे जिल्हाध्यक्ष म्हणून बाबा गुजर तर प्रदेश प्रवक्तेपदी प्रशांत पवार यांची गुरुवारी (ता. ६) नियुक्ती केली. गुजर यांना तीनच दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी पक्षातून बडतर्फ केले होते.

बाबा गुजर, प्रशांत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती सतीश शिंदे, नरेश अरसडे, राजा आकारे, भागेश्वर फेंडर, रमेश फुले, पुंडलीक राऊत आदी पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. उर्वरित नियुक्त्याही लवकरच जाहीर होतील. हे बघता नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी मोठी फाटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राज्यातून सर्वप्रथम निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये बाबा गुजर यांचा समावेश होता. पवार हे प्रफुल्ल पटेल यांचे तर ईश्वर बाळबुधे हे छगन भुजबळ यांचे समर्थक असल्याने ते जातील याचा अंदाज सर्वांनाच होता. सतीश शिंदे आणि नरेश अरसडे हे माजी गृहमंत्री तसेच अनिल देशमुख यांच्या काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातील आहेत.

देशमुख आणि शिंदे घराण्यात सुरुवातीपासूनच राजकीय वैमनस्य आहे. सतीश शिंदे यांनी शिवसेनेतून देशमुख यांच्याविरुद्ध यापूर्वी विधानसभेची निवडणूक लढवली आहे. अरसडे हे पूर्वी देशमुख समर्थक होते. देशमुखांमुळे राजकीय अडचण होत असल्याने दोघांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) विभागीय कार्यालय बजाजनगर काचीपुरा येथील प्रशांत पवार यांच्या कार्यालयात आहे. या कार्यालयासमोरच्या फलकाचे उद्‍घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. अलीकडे महिनाभरापूर्वी अजित पवार (AJit Pawar) यांनीही याच कार्यालयात पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला होता. तब्बल तासभर ते या कार्यालयात होते. गणेशपेठ येथील कार्यालयावर सध्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाचा ताबा आहे. त्यामुळे सुरुवातीला बजाजनगर येथून पक्षाचे सूत्रे हलणार असल्याचे दिसून येते.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT