Amol Mitkari and Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Nagpur News : ‘अमोल, असलं काही ट्विट वगैरे करू नकोस बाबा…’ असं अजित दादांनी सांगूनही मिटकरींनी बाॅम्ब टाकलाच !

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar to Amol Mitkari : शिंदे-फडणवीसांच्या सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर नेते, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 'सत्ताप्रवेशा'ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या 'खुर्ची'ला धक्का बसण्याच्या चर्चा असतानाच, अजिदादांचे लाडके आमदार अमोल मिटकरींच्या ‘ट्विट'ने शनिवारी सकाळीच गोंधळ उडविला. (MLA Amol Mitkari's tweet created a stir on Saturday morning)

नेमके मुख्यमंत्री दिल्लीत अन् तेही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला असल्याचे 'टायमिंग' हेरूनच मिटकरींनीही अजितदादांना मुख्यमंत्रिपदाच्या शुभेच्छा दिल्या. राज्य आणि आता तर देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आलेल्या अजितदादांनी वादग्रस्त, सनसनाटी विधाने न करण्याचा सल्लावजा आदेशच मिटकरींना दोनदा दिला आहे.

तरीही, साऱ्या राजकारण्यांची झोप उडविलेले मिटकरी अजितदादांचेही ऐकत नसल्याचे उघड झाले आहे. विश्वासू सहकारी, पक्षाच्या प्रवक्तापदाची धुरा असलेल्या मिटकरींनी हे ठरवून केले की, त्यांना तशा सूचना होत्या, हे कळायला मार्ग नाही.

अजित पवार… महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री. यावर्षी ते पाचव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित दादा म्हटले की डोळ्यांसमोर येते ती करारी बाणा असलेलं व्यक्तीमत्व. कार्यकर्त्यांवर निस्सीम प्रेम करणारा नेता, त्याचवेळी प्रशासनावर जबरदस्त पकड असलेला कुशल प्रशासक. अशा अजित पवारांचा आदेश भले भले टाळू शकत नाही. पण अमोल मिटकरी मात्र याच्यातही वेगळेच निघाले.

अजित पवारांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना बजावले आहे की, ‘भावी मुख्यमंत्री’, ‘जनतेच्या मनातले मुख्यमंत्री’, असे बॅनर्स, पोस्टर्स लाऊ नका, तसे ट्विट वगैरे काही करू नका. पण काही उत्साही कार्यकर्ते काही ऐकत नाही. आज अजित पवारांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच बॅनर्स, पोस्टर्स झळकणे सुरू आहे आहे. अमोल मिटकरींनाही अजित पवारांनी सांगितले आहे की, ‘अमोल, असलं काही ट्विट वगैरे करू नको बाबा…’ पण अमोल मिटकरी दादांचेही ऐकत नाही, हे आज लक्षात आलं.

याही उपर जाऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. कालपासून आमदार मिटकरींची आणि त्यांच्या ट्विटचीच चर्चा सुरू आहे. त्याच्या ट्विटने तर एकनाथ शिंदे गटातील नेत्यांची झोप उडवून दिली आहे. यासंदर्भात ‘सरकारनामा’ने आमदार अमोल मिटकरी यांच्याशी संवाद साधला.

आमदार मिटकरी म्हणाले, मी महाराष्ट्रात अजित दादा गटाचा प्रवक्ता म्हणून काम करतो आहे. दादा हे सर्वमान्य नेते आहेत. आज त्यांचा अभीष्टचिंतन सोहळा आहे. सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे की, दादांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे. मीसुद्धा एक सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझी भावना मी ट्विटद्वारे व्यक्त केली. त्यानंतर विविध प्रश्‍न महाराष्ट्रात उपस्थित झाले आहेत.

अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होणार. पण ते केव्हा होणार? उद्या, परवा की येत्या आठ दिवसांत? असे काहीही नाही आमचं लक्ष्य २०२४च्या निवडणुका (Elections) आहेत. दादांच्या नेतृत्वात जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता स्वतःला झोकून देईन. त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, ही आमची इच्छा आहे, असे आमदार मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT