Anil Sole, Girish Mahajan, Sudhakar Kohale, Bunty Kukde and Pravin Datke. Sarkarnama
विदर्भ

Nagpur BJP News: सहाही विधानसभा क्षेत्रांत भाजपचा झेंडा फडकविणार, सूत्र स्वीकारताच कुकडेंची घोषणा !

सरकारनामा ब्यूरो

Nitin Gadkari will be elected with a margin of five lakh votes : आगामी २०२४ हे निवडणुकांचे वर्ष आहे. यात लोकसभा, विधानसभेसह महापालिका निवडणुका होतील. महापालिका निवडणुकीत १२० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य असल्याचे भाजपचे नवनियुक्त शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी सांगितले. (Municipal elections will be held along with Legislative Assembly)

लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाच लाखांवर मतांच्या फरकाने निवडून आणणार असून सहाही विधानसभा क्षेत्रांत भाजपचा झेंडा फडकविणार, असा विश्वासही कुकडे यांनी व्यक्त केला. गणेशपेठ येथील भाजपच्या कार्यालयात बंटी कुकडे यांनी रविवारी मावळते अध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांच्याकडून शहराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, नवनियुक्त ग्रामीण भाजपचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार गिरीश व्यास, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, उपेंद्र कोठेकर, माजी महापौर अर्चना डेहनकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुकडे म्हणाले, शहरात भाजपचे १५८ बूथ अध्यक्ष असून ते श्रीकृष्णाच्या भूमिकेत तर कार्यकर्ते अर्जुनाच्या भूमिकेत दिसून येतील.

मी युवा मोर्चात काम केले. भाजप एक परिवार असून रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठा आहे. पुढील निवडणुकीनिमित्त सर्वांसोबत मिळून काम करणार असून ज्येष्ठांकडूनही त्यांनी सहकार्याची अपेक्षा कुकडेंनी व्यक्त केली. आमदार कृष्णा खोपडे यांनी शहरातील भाजपचे यश आतापर्यंत केलेल्या अध्यक्ष, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असल्याचे सांगितले. दटके भाजयुमोचे अध्यक्ष होते, कुकडेही होते. त्यामुळे भाजपमधील संघटनात्मक बांधणी इतर पक्षापेक्षा वेगळी असल्याचे त्यांनी सांगितले.

कुकडे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. कुकडे यांना सर्व मिळून सहकार्य करीत पक्ष आणखी बळकट करण्यात येईल. भाजपचे (BJP) खासदार, सहाही आमदार तसेच नगरसेवक कसे निवडून आणता येईल, मतदार कसे वाढतील, याचा विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. दटके यांनी महापालिकेत १२० जागा जिंकण्याचा संकल्प करतानाच कुकडे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेल्या सहकार्यासाठी त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी आमदार मोहन मते, उपेंद्र कोठेकर यांचीही भाषणे झाली. संचालन संजय बंगाले यांनी केले.

कुंभारेंना अजूनही शेळकेंची धास्ती !

आमदार विकास कुंभारे यांनी भाषणाची सुरुवात करताना बंटी कुकडेंऐवजी बंटी शेळके, असे संबोधले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. बंटी कुकडे राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे (Congress) नेते असून त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत (Election) विकास कुंभारे यांना जेरीस आणले होते. त्यामुळे कुंभारेंना अजूनही शेळकेंची धास्ती असल्याची चर्चा रंगली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT