Nagpur Politics : एका-एका कार्यकर्त्यांला जोडण्याची धडपड उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला करावी लागत आहे. महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची वेळ आली तर किमान 50 सक्षम उमेदवार आपल्याकडे हवे असे प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. मात्र, त्यांना मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रवी पराते यांनी जबर धक्का दिला.
पराते यांनी मनगटावरचे घड्याळ काढून काँग्रेसचा हात हातात घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत आहे की विरोधात हेच समजत नाही. नागपूरमध्ये महायुतीला भाजपने हायजॅक करून ठेवले आहे. आमचेही प्रदेश स्तरवरचे नेते कोणासाठी भांडत नाही, आग्रह धरत नाही. त्यामुळे आपण काँग्रेसध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे पराते यांचे म्हणणे आहे.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पराते यांच्याच प्रभागात राहणारे माजी नगरसेवक आणि मध्य नागपूरमधून विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी करणारे रमेश पुणेकर यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पक्षात परत प्रवेश देण्यात आला होता. हे बघता पराते आणि पुणेकर आता एकाच प्रभागातून व एकाच पॅनेलमधून लढणार असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसने दिले.
पराते यांचा सामना माजी उपमहापौर आणि भाजपचे नगरसेवक दीपराज पार्डीकर यांच्याशी होण्याची शक्यता आहे. रवी पराते विद्यार्थी दशेपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. ते विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष होते. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यानंतर मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने रवी पराते यांच्यावर महापालिकेच्या निवडणुकीत डाव लावण्याचे ठरवले होते. मात्र त्यापूर्वीच ते सोडून गेले. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपले कुठलेच वैर नाही, शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी नेहमीच साथ दिली. मात्र पक्षाचे नागपूरमध्ये काहीच लक्ष नाही. कोणाची मदत मिळत नाही. प्रभागामध्ये काम करण्यासाठी निधी लागतो. नेत्यांचे पाठबळ लागते. आम्ही सत्ताधारी महायुतीच आहोत हे जरी खरी असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसला कुठेच स्थान मिळत नाही, अशी नाराजी पराते यांनी व्यक्त केली.
भाजपकडे मोठी यंत्रणा आहे. कार्यकर्त्यांची फौज आहे. अधिकारी त्यांचेच ऐकतात. त्यामुळे आम्हाला सत्तेत आहोत की विरोधात हेच कळत नाही. शासकीय समित्या सोडा साधे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचे पद द्यायलासुद्धा भाजपचे नेते तयार नाहीत. आमचेही प्रदेश स्तरावरचे नेते यासाठी आग्रह धरत नसल्याची नाराजी रवी पराते यांनी व्यक्त केली.
काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. शहरभर संघटन आहे. विकास ठाकरे यांच्यासारखा आक्रमक नेता आहे. ते कार्यकर्त्यांसाठी भांडतात. राजकीय राजकीय भवितव्याचा विचार करूनच आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे रवी पराते यांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.