Maharashtra Transport Department News : राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागात सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
नागपूर जिल्ह्यातील इमामवाडा आगारातून एसटी महामंडळाची वातानुकूलित ‘शिवाई’ बस चोरण्याचा थरारक प्रयत्न उघडकीस आल्यानंतर परिवहन विभागात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याची पार्श्वभूमी समोर आल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव विष्णू गणपती नीलावार (वय 22) असून तो तेलंगणातील रंगारेड्डी येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे तो हैदराबादच्या शहर परिवहन विभागात साफसफाईचे काम करत होता. त्यामुळे बसची रचना, तांत्रिक बाबी आणि सुरक्षेतील त्रुटी याची त्याला चांगली माहिती होती.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विष्णूचा डाव 'परिवहन'ची (MSRTC) बस चोरी करून त्यातील बॅटरी, टायर आणि इतर महागडे साहित्य वेगळे करून विकण्याचा होता. आरोपीवर यापूर्वी हैदराबादमध्ये चोरीचे गुन्हे दाखल असून तो वारंवार चोरीच्या प्रकरणात अटक झाल्याने तुरुंगातही जाऊन आला आहे.
नांदेडमध्येही त्याच्याविरोधात तत्सम गुन्हा नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चौकशीत त्याची मानसिक स्थिती संशयास्पद असल्याचाही प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, या संपूर्ण घटनेत अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत. आरोपीने इमामवाडा आगाराच्या मुख्य प्रवेशद्वारातून बस बाहेर काढली, मात्र त्यावेळी प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता. आगारात एकूण 13 सीसीटीव्ही कॅमेरे असताना नेमका एकच महत्त्वाचा कॅमेरा बंद कसा होता, यावरून संशय अधिक गडद झाला आहे.
याशिवाय, घटनेच्या रात्री मुसळधार पाऊस असल्याने परिसरात पाणी साचले होते. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने मुख्य गेट व्यवस्थित बंद केले नसल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या सर्व घडामोडींमुळे बस चोरीच्या प्रयत्नामागे आगारातील कोणीतरी मदत केली का, असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
इमामवाडा आगाराचे व्यवस्थापक प्रतीक पवार यांनी सांगितले की, अमरावती येथे नेण्यात आलेली चोरीची ‘शिवाई’ बस गुरुवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास पुन्हा नागपूरमध्ये आणण्यात आली. मात्र पोलिसांची चौकशी पूर्ण न झाल्याने बस अद्याप अधिकृत ताब्यात देण्यात आलेली नाही. या घटनेत बसच्या काचा आणि वायपरचे नुकसान झाल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे आता एसटी आगारांमधील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.