Sudhakar Adbale Sarkarnama
विदर्भ

MVA News: महाविकास आघाडी पुरस्कृत, विमाशिचे सुधाकर अडबालेंची आघाडी कायम !

Nagpur Division Teachers Constituency Elections : ही आघाडी वाढल्यास किंवा अशीच कायम राहिल्यास ते विजयापासून जास्त दूर नाहीत.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Elections News: नागपूर (Nagpur) विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची साथ मिळाल्यास विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले विजयी होऊ शकतात, असा अंदाज सुरुवातीपासून लावला जात होता. सुरुवातीला तरी हा अंदाज खरा ठरताना दिसतोय.

पहिल्याच फेरीत सुधाकर अडबाले चांगली आघाडी घेतल्याची माहिती पुढे येत आहे. नेमकी आकडेवारी अद्याप कळू शकलेली नाही. पण ही आघाडी वाढल्यास किंवा अशीच कायम राहिल्यास ते विजयापासून जास्त दूर नाहीत. किंबहुना पहिल्याच फेरीत ते विजयी होतील, अशी चर्चा मतमोजणी केंद्राच्या बाहेर सुरू आहे. अडबालेंच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महाविकास आघाडी, (Mahavikas Aghadi) त्यातल्या त्यात कॉंग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांमध्येही सध्या आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.

मतदानाला आज सकाळी ८ वाजता नागपूर शहरातील अजनी रेल्वेचे समुदाय भवन येथे सुरुवात झाली. त्यानंतर सुरूवातीलाच अडबालेंनी आघाडी घेतली. या निवडणुकीत सुरुवातीपासून ट्विस्ट बघायला मिळाले. शिक्षक परिषदेने नागो गाणार यांच्या उमेदवारीची घोषणा खूप आधीच केली होती. नेहमी भारतीय जनता पक्ष शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला पाठिंबा देते. पण यावेळी भाजपने नागो गाणार यांना पाठिंबा घोषित करण्यास विलंब केला. त्यामुळे तेथे इच्छुकांच्या आशा बळावत गेल्या. परिणामी गाणार यांना विरोधही बघायला मिळाला. पण अपेक्षेप्रमाणे भाजपने अखेर गाणारांना पाठिंबा घोषित केला.

गाणारांना पाठिंबा घोषित केल्यानंतर त्यांच्या विजयाची खात्री दिली जात होती. इकडे शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळविण्यासाठी झगडत होते. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीने महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांना मोठी मदत केली होती. त्याबदल्यात महाविकास आघाडीने या निवडणुकीत आपल्याला मदत करावी, यासाठी ते कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, शहराध्यक्ष नाना पटोले यांच्यासह कॉंग्रेसच्या संबंधित नेत्यांना भेटले. पण त्यांना कॉंग्रेसने शेवटपर्यंत मदतीचा हात दिला नाही. त्यामुळे त्यांना ‘एकला चलो रे...’ची भूमिका घ्यावी लागली.

राजेंद्र झाडे यांनी कुठवर मजल मारली हे आज कळणारच आहे. पण महाविकास आघाडीने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांना पाठिंबा घोषित केला. पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीने उशीर जरी लावला असला, तरी महाविकास आपल्यासोबतच आहे, अशी खात्री बाळगून अडबाले कामाला लागले होते आणि घडलेही तसेच. त्यामुळे अडबालेंचा आत्मविश्‍वास चांगलाच बळावला होता. आज सुरू झालेल्या मतमोजणीची सुरूवातही अडबालेंच्याच बाजूने झाली. आता पुढच्या एक-एक फेरीगणिक काय निकाल हाती येतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दोन वेळा नागपूर शिक्षक मतदार संघाचे आमदार राहिलेले आमदार नागो गाणार यांना सुधाकर अडबाले यावेळी रोखतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT