Maratha Resrvation  Sarkarnama
विदर्भ

Nagpur Winter Session : विरोधकांनो, आरक्षणापासून मराठ्यांना वंचित का ठेवलं? बॅनरबाजीने वेधले लक्ष

जयेश विनायकराव गावंडे

Assembly Session : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सध्या आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्याचे पडसाद नागपूर येथे सुरू झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटू लागले आहेत. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधानभवन परिसरात रस्त्यांच्या दुतर्फा मराठा आरक्षणासंदर्भात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर चर्चा होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विधान भवन (Assembly) परिसरात वेगवेगळ्या प्रकारची बॅनरबाजी मराठा आरक्षणावरून करण्यात आली आहे. मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमधून काही प्रश्न मराठा आरक्षणासंबंधी नेत्यांना विचारण्यात आले आहेत. काही ठिकाणी बॅनर काढण्यात आले आहेत. अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने चर्चा व्हावी, अशी बॅनरमधून मागणी करण्यात आली आहे.

विरोधकांनो, मराठा समाजाला ६० वर्षांपासून आरक्षणपासून वंचित का ठेवले, असा सवाल देखील बॅनरवरून विचारण्यात आला आहे. नागपुरात लावण्यात आलेल्या बॅनर वरून आता विरोधक हा मुद्दा अधिवेशनात लावून धरतात का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशनात चर्चा व्हावी अशी बहुतांश आमदारांची इच्छा आहे. मात्र अद्यापपर्यंत सरकारने मराठा, ओबीसी, धनगर आरक्षण आदी विषयांवर चर्चा होणार का, ही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाजूने असलेले अनेक आमदार चर्चेची मागणी करीत आहेत.

दुसरीकडे या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. विरोधकांनी मांडलेल्या विषयावर आम्ही चर्चा करायला तयार आहोत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमताने ठराव झाला आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी समितीचे काम आणि अभ्यास सुरू आहे, असे ते म्हणाले. 

दरम्यान, शहराच्या हद्दीमध्ये बॅनर लावण्यासाठी काही नियम आहेत. या नियमांचे पालन न करता लावण्यात आलेले अनेक बॅनर्स काढण्यात आलेले आहेत. यामध्ये विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उभारलेल्या स्वागत व शुभेच्छापर फलकांसह मराठा आरक्षणासाठी लावण्यात आलेल्या बॅनर्सचाही समावेश आहे.

 (Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT