Nitin Gadkari Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : भाजपच्या ‘शुअर शॉट विनिंग सीट’वरच्या नितीन गडकरींचे नाव पहिल्या लिस्टमध्ये का नाही?

Maharashtra BJP : केंद्रातील दिग्गजांपैकी एक असलेल्या नेत्याचे नाव वगळल्याने भाजपच्या वर्तुळात चर्चांना उधाण. केंद्रीय नेतृत्वाला नेमका कोणता संदेश द्यायचा असल्याची कुजबूज

प्रसन्न जकाते

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी भाजपने शनिवारी (ता. दोन) देशातील 195 मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी वाचून दाखवली. यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शाह हे गुजरातमधील गांधीनगर येथून दुसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत. पहिल्याच यादीत भाजपच्या 34 केंद्रीय मंत्री, 28 महिलांना स्थान देण्यात आले आहे. मात्र, या यादीत भाजपचे दिग्गज नेता आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव वगळण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे नितीन गडकरी हे यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यामुळे त्यांच्या नावाला आजही तितकेच महत्व आहे.

तावडे यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा उल्लेख नव्हता. महाराष्ट्राबाबत स्वतंत्र यादी जाहीर होणार असली तरी नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांची जागा भाजपसाठी ‘शुटर शॉट विनिंग सीट’ आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशातही गडकरी यांनी देशभरात केलेल्या कामाचा डंका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यानंतर असलेल्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये नितीन गडकरी यांचेही नाव घेतले जाते. अशात त्यांचेच नाव न घेतल्याने महाराष्ट्राच्या भाजपमध्ये व गडकरींच्या चाहत्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. नागपुरातून लोकसभेची उमेदवारी नितीन गडकरी यांनाच मिळणार, हे जवळपास निश्चित आहे. गडकरींच्या विरोधात कोणाला उमेदवारी द्यायची, असा पेच विरोधकांना आहे. चित्र इतके स्पष्ट असतानाही भाजपच्या ‘शुअर शॉट विनिंग सीट’वरच्या नितीन गडकरींचे नाव पहिल्या लिस्टमध्ये का नाही? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्राचा समावेश नाही

पहिल्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत अनेक मंत्र्यांना स्थान देण्यात आले. अगदी दोन दिवसांपूर्वी बीआरएस सोडून आलेल्या बी. बी. पाटील यांचे नावही यादीत आहे. ही सर्व मंडळी नितीन गडकरी यांना ‘ज्युनिअर’ असल्याचे ठाऊक असतानाही असे का करण्यात आले यावर खल होत आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये अनेक आयारामांना प्राधान्य देण्यात आले आहे. महाराष्ट्रात महायुतीची चर्चा अद्याप सुरू असल्याने कदाचित पहिल्या यादीतून महाराष्ट्राला वगळले असावे, असे सांगण्यात येत आहे. परंतु गडकरी यांच्या नावाचा समावेश करून भाजपला विजयाची हमखास हमी असलेल्या या जागेवरील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविता आला असता, असे बोलले जात आहे.

मोठ्या नावांचा समावेश

भाजपच्या पहिल्या यादीत काही मोठी नावेदेखील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (गांधीनगर, गुजरात), केंद्रीय मंत्री किरण रिजेजू, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, राजीव चंद्रशेखर यांची नावे पहिल्या यादीत आहेत. मध्य प्रदेशमधील गुणामधून ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना विदिशामधून (मध्य प्रदेश) उमेदवारी जाहीर झाली आहे. राजस्थानच्या बिकानेरमधून केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांना उमेदवारी दिली गेली आहे. कोटामधून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लव देब, मथुरेच्या विद्यमान खासदार हेमा मालिनी यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. लखीमपूर खिरीमधून अजय मिश्रा टेनी यांना संधी मिळाली आहे. उन्नावमधून साक्षी महाराज यांना त केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लखनौमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी भाजपने दिली आहे. यातील काही लोक भाजपमध्ये ज्येष्ठ आहेत.

ओबीसी समाजाचा बोलबाला

भाजपच्या पहिल्या यादीत 28 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत 47 असे उमेदवार आहेत, ज्यांचे वय 50 पेक्षा कमी आहे. यादीत 27 उमेदवार अनुसूचित जातीचे (SC), 18 उमेदवार अनुसूचित जमातीचे, 57 उमेदवार हे ओबीसी असल्याचे तावडे यांनी जाहीर केले आहे. देशातील ओबीसी मतांचा टक्का पाहता निवडणूक यादीत हा समतोल साधण्यात आला आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT