Lok Sabha Election 2024 : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रोडकरी, पुलकरी म्हणून देशभर ओळखले जातात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, नंतर राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा ते राहिलेले आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा ते निवडून आलेले आहेत. असे असतानाही भाजपच्या निरीक्षकांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पचनी न पडणारा प्रश्न विचारला. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच संतापले होते.
भाजपच्यावतीने सर्वच लोकसभा मतदारसंघांत निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे निरीक्षक मतदारसंघात जाऊन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करीत आहेत. सोबतच उमेदवारांविषयी मत जाणून घेत आहेत. काल (ता. 29 फेब्रुवारी) निरीक्षक खासदार मनोज कोटक आणि माजी खासदार अमर साबळे नागपूरला येऊन गेले. त्यांनी काही पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.
आगामी लोकसभेच्या निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हवे की दुसरा उमेदवार, अशी विचारणा भाजपच्या निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केली. यावेळी सर्वांनी गडकरी हेच आमचे नेते आणि उमेदवार असल्याचे ठासून सांगितले. कारण गडकरींना उमेदवारी मिळणार नाही, ही बाबच मुळात न पटणारी आहे. इतर मतदारसंघांमध्ये हा प्रश्न विचारणे समजू शकतो. पण नागपूरसाठी हा प्रश्न विचारलाच जाऊ नये, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपची निवडणुकीची तयारी, उमेदवाराविषयी मत, विजयाची शक्यता, यासह विविध माहिती जाणून घेतली. नितीन गडकरी उमेदवार हवे की दुसरे, अशी विचारणा निरीक्षकांनी केली. हा प्रश्न अनेकांना रुचला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री म्हणून गडकरी यांची कामगिरी संपूर्ण देशाला ठाऊक आहे. त्यांचा संपर्क, जनाधार, समाजकार्य, विकासकामे याविषयी विरोधकांनाही शंका नाही. त्यामुळे हा प्रश्नच नागपूरमध्ये उपस्थित होत नसल्याचे अनेकांनी ठणकावून सांगितल्याचे कळते.
कार्यकर्ते अस्वस्थ..
भाजपने मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील विधानसभेच्या निवडणुकांत अनेक खासदार व केंद्रीय मंत्र्यांना राज्यांत पाठवले होते. काही ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवले. हे बघता लोकसभेच्या निवडणुकीत मोठे बदल केले जातील, अशी चर्चा आहे. अधूनमधून नितीन गडकरी यांच्याही उमेदवारीबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर निरीक्षकांनी नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत मत विचारल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होते. दहा वर्षांपासून केंद्रीय मंत्री आहेत. नागपूरमधून सलग दोन वेळा लोकसभा जिंकली आहे. असे असताना त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न उपस्थित करणे अनेकांना पटलेले नाही.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.