Nana Patole
Nana Patole Sarkarnama
विदर्भ

नाना विचारतात; देश विकणाऱ्यांसोबत रहायचं की वाचवणाऱ्यांसोबत?

संजय डाफ

नागपूर : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने (BJP Government) देशात तबाही चालविली आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जीं (Mamata Banerjee) यांचे वक्तव्य देश विकणाऱ्यांचा साथ देणारे होते. त्यामुळे देश विकणाऱ्यांसोबत रहायचं की देश वाचवणाऱ्यांसोबत, हे राजकीय पक्षांनी ठरवायचे आहे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आज म्हणाले.

आज सकाळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. पटोले म्हणाले, आज सामना वृत्तपत्रातून जी भूमिका मांडली गेली, ती देश हितासाठी मांडली गेली आहे. सरकार वाचवण्यासाठी नाही. सामनातून ममता बॅनर्जींवर केलेली टिका अगदी योग्य आहे. कॉंग्रेस पक्षाने देशासाठी मोठे बलिदान दिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कॉंग्रेसने संघर्ष केला आहे. सद्यःस्थितीत असलेल्या दुष्प्रवृत्तींपासून देशाला वाचवायचे असेल, तर कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही.

आमची लढाई विचारांची..

कॉंग्रेस पक्षात अंतर्गत फेरबदल करण्याचा अधिकार हायकमांडच्या हातात आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीत काही लोक घोडेबाजार करतात, तर काही लोक विचाराने जिंकतात. कॉंग्रेस हा एक विचार आहे. आम्ही विचारांची लढाई लढतो. विधानपरिषद निवडणुकीत आमचा उमेदवार विचारांची लढाई लढतो आहे. त्याच्यापुढे धनशक्ती हारणार आहे. पदवीधर निवडणुकीप्रमाणे विधानपरिषद निवडणुकीतही विजय आमचाच होणार आहे, असे पटोले म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांवर करावी कारवाई..

सेवा नियमानुसार एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जावी. कारण संपामुळे प्रवाशांचं मोठं नुकसान होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, ही भूमिका कॉंग्रेसचीही आहे. पण कर्मचाऱ्यांनी तुटेपर्यंत ताणू नये. सरकार त्यांच्याच हिताचा विचार करत आहे. वेतन वाढवून दिले आहे आणि टप्प्याटप्यांनी ते आणखी वाढवता येईल. पण त्यांची विलीनीकरणाची मागणी आत्ता तात्काळ मान्य करता येणार नाही. विरोधी पक्षाचे लोक त्यांची दिशाभूल करीत आहेत. कर्मचाऱ्यांनी आता त्यातून सावरायला हवे. नाहीतर तेल गेलं, तूपही गेलं अन् हाती आलं धुपाटणं, अशी स्थिती एसटी कर्मचाऱ्यांची व्हायला वेळ लागणार नाही, असे पटोले यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने मुसंडी मारली. त्या निवडणुकीला कॉंग्रेस पक्ष विचारांनी सामोरे गेला होता. आम्ही ती निवडणूक स्वतंत्र लढून काय दाखवायचे होते, ते सिद्ध केले. यापुढील निवडणुकाही आम्ही स्वबळावरच लढण्याचे प्रयत्न करत आहोत. विचारांच्या या लढाईत आम्हाला यश नक्की मिळेल, असा विश्‍वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT