Arvindbabu Deshmukh News : “विधायक कार्याचे जनक स्व. अरविंदबाबू देशमुख यांच्याबद्दल बरेच ऐकले होते. परंतु प्रत्यक्ष काटोलमध्ये येऊन त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल जाणून घेता आले. देशमुख परिवाराने काटोल-नरखेड तालुक्यांत वर्षानुवर्षे समाजसेवेचा वारसा टिकवला आहे. स्व. अरविंदबाबू यांच्यानंतर रणजीत देशमुख आणि डॉ. आशिष देशमुख यांनी समाजसेवेला वाहून घेतल्याचं दिसतंय. राजकारणातून समाजसेवेचे हे उत्तम उदाहरण आहे, असे सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर म्हणाले.
अरविंदबाबू देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण काल नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या हस्ते झाले. त्यानंतर काटोलच्या (Katol) तालुका क्रीडा संकुल, धंतोली येथे आयोजित एका भव्य सभेत ते बोलत होते. झालेल्या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, शेतकरी हा समाजाचा कणा आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही, तोपर्यंत भारत समृध्द होऊ शकत नाही. स्वातंत्र्य सेनानी अरविंदबाबू हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी होते, थोर समाजसेवक होते. त्यांच्या नावाने अरविंद सहकारी बॅंक स्थापन करून डॉ. आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) यांनी त्यांच्या स्मृती जपण्याचे मोठे काम केले आहे. आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, ही दुःखद बाब आहे. शेतकरी आत्महत्या हे आजचे सर्वात मोठे विदारक चित्र आहे. ते बदलणे आवश्यक आहे. राज्यात सरकार कुणाचेही असो, ज्या दिवशी शेतकरी आत्महत्या करणे थांबवेल, त्या दिवशी महाराष्ट्र (Maharashtra) सुजलाम सुफलाम समजावा, असे नानांनी सांगितले.
राजकारणी लोकांनी आपल्यामधील भिंती पाडून काम केल्यास जनतेचे भले होईल. मी राजकारणावर बोलणार नाही. सामाजिक जाणीव ठेऊन काम करणे गरजेचे आहे. जनतेने स्वत:मधील ताकद ओळखावी, म्हणजे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता येईल. जास्त हव्यास न ठेवता गरजेपुरते मिळाले तरी समाधान मानावे, असे नाना पाटेकर म्हणाले. अरविंद सहकारी बँक लि. चे अध्यक्ष डॉ. आशिष. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, थोर समाजसेवक आणि शेतकरी नेते स्व. अरविंदबाबू देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शेतकऱ्यांच्या हितासाठी झटत असलेल्या नाना पाटेकर यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाच्या उपस्थितीत होत आहे, म्हणून या सोहळ्याला विशेष महत्व आहे.
नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून एक लोकचळवळ सुरू केली. त्या चळवळीतून त्यांनी दुष्काळी भागात तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत केली. चित्रपटाच्या पडद्यावरचा उपदेश आणि प्रत्यक्ष जीवनातील अशी कृती या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. नाना पाटेकर अशा वेगळ्या म्हणजे कर्त्या सुधारक व्यक्तिमत्त्वांपैकी आहेत. मी त्यांच्या कार्याला अभिवादन करतो. शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय बिकट आहेत. त्यांच्यासाठी भरपूर काम करावे लागेल. त्यासाठी नाना पाटेकर यांच्यासारख्यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व लाभले तर ते काम वेगाने पुढे जाऊ शकते, असे आशिष देशमुख म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी नाना पाटेकर यांचा शाल, श्रीफळ व आकर्षक प्रतीकात्मक बैलगाडी देऊन सत्कार केला. काटोल नरखेड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना १५ हजारांच्या धनादेशांचे वाटप नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री रणजीत देशमुख उपस्थित होते. डॉ. भाऊसाहेब भोगे, श्रीमती रुपा देशमुख, आयुश्री देशमुख यांची यावेळी उपस्थिती होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.