congress party workers Sarkarnama
विदर्भ

Power Projection : अकोल्यात कार्यकर्त्यांनी अशा दिल्या घोषणा की नानाभाऊंचा चेहराही खुलला

Demand from Akola : उपस्थितांनी सांगितले की, कसा असावा मुख्यमंत्री

जयेश विनायकराव गावंडे

Nana Patole in Akola : अनेक वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव, जनसंपर्क आणि पाठीशी असलेल्या समर्थकांमुळे राज्यातील अनेक नेत्यांना आता आपण मुख्यमंत्री व्हावे, असे वाटू लागले आहे. भाजप, शरद पवार गट, अजित पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव सेना, शिंदे सेनेसोबत काँग्रेसमध्येही मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार असणाऱ्यांची भली मोठी यादीच आहे. यापैकी अनेकांच्या नावाने ‘भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे पोस्टर्सही झळकले आहेत. परंतु शुक्रवारी (ता. २७) अकोल्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यादरम्यान असा एक नारा पुन्हा बुलंद केला की, सारे बघत राहिले. (Nana Patole should be the chief minister slogans in Akola)

अकोला जिल्हा काँग्रेसमधील नेत्यांमध्ये सध्या शीतयुद्ध सुरू आहे. एकमेकांना ‘खो’ देण्याच्या प्रकारांमध्ये इतकी वाढ झालीय की, अगदी पिस्तूल काढण्याची धमकी देईपर्यंत प्रकरण पोहोचलंय. त्यामुळं अकोला काँग्रेसच्या ‘पंजा’ची बोटं पार तुटली, असा संदेश पक्षश्रेष्ठींपर्यंत गेला. पंजाच्या या मोडलेल्या बोटांना प्लास्टर बिस्टर करून काही इलाज करता येतो का, हे बघण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनीच ‘मिशन डॅमेज कंट्रोल’ हाती घेतलं व ते अकोल्यात पोहोचले.

पटोले यांनी या वेळी अकोल्यातील काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या स्वराज्य भवनात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांनीही या वेळी ‘मुख्यमंत्री कैसा हो... नानाभाऊ जैसा हो...’ अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. अचानक सुरू झालेल्या या घोषणाबाजीमुळे स्वराज्य भवनात उपस्थित काँग्रेसचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते बघतच राहिले.

काही दिवसांपूर्वी पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर्स राज्यभरात लावले होते. त्यानंतर नाना पटोलेही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. नाना पटोले यांच्याकडूनही वेळोवेळी मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रकट झाल्याचे काँग्रेसमधील नेते सांगतात. त्यामुळे अकोल्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी नानाभाऊंना खूष करण्यासाठी घोषणाबाजी केली. पटोले यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेशही घेतला. परंतु जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील वाद निस्तरता निस्तरता जिथे नेत्यांना घाम सुटतोय तिथे नव्यानं पक्षात येणाऱ्यांचं काय करायचं व त्यांना कोणतं पद द्यायचं, असा प्रश्नही काँग्रेसला पडणार असल्याची चर्चा काँग्रेस कार्यालयात होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षातील वाद सोडविण्यासाठी अकोल्यात आलेले नानाभाऊ दोन नेत्यांना नोटीस बजावतील, असे संकेत आधीच प्राप्त झाले होते. परंतु भाऊंसमोर आणि प्रसार माध्यमांसमोर जाहीरपणे कोणताही तांडव होणार नाही ना, याची काळजी स्थानिक नेत्यांना होती. ही चिंता अनेक नेत्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवतही होती. परंतु अशात नानाभाऊ आणि सीएमसंदर्भात घोषणा सुरू झाल्या आणि वातावरण बदलले अन‌् ते ऐकून नानाभाऊंचा चेहराही खुलला.

(Edited by : Prasannaa Jakate)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT