Narendra Bhondekar and others Sarkarnama
विदर्भ

Narendra Bhondekar News : शिंदे गटाचे आमदार भोंडेकरांचा प्रचार झाला सुरू, ‘असे’ आणले निवडणूक चिन्ह समोर !

Bhandara-Pavani : आमदार भोंडेकरांनी आपल्या निवडणूक चिन्हाचा प्रचार अप्रत्यक्षपणे केला आहे.

अभिजीत घोरमारे

Bhandara District Political News : भंडाऱ्याचे अपक्ष आमदार आणि शिंदे गटाचे समर्थक नरेंद्र भोंडेकर यांनी आत्तापासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. २०१९च्या निवडणुकीत ‘लकी’ ठरलेल्या ‘ट्रॅक्टर’ या निवडणूक चिन्हाचा आत्तापासून प्रचार करायला सुरुवात केली असल्याचे एका कार्यक्रमातून दिसून आहे. (MLA Bhondekar has promoted his election symbol indirectly)

एका जाहीर सभेत आमदार भोंडेकरांनी आपल्या निवडणूक चिन्हाचा प्रचार अप्रत्यक्षपणे केला आहे. त्यामुळे भोंडेकरांना आतापासूनच प्रचार सुरू करण्याची लगीनघाई झाल्याचे बोलले जात आहे. काल १ ऑक्टोबरला भंडाऱ्याच्या पवनी येथे ओबीसींच्या समर्थनार्थ भोंडकरानी बाइक रॅली काढली. शेकडो बाइकस्वारांना घेऊन आमदार भोंडेकर स्वतः रॅलीचे नेतृत्व करत पवनी-भंडारा येथे मार्गक्रमण केले.

भंडारा येथे दुपारच्या दरम्यान बाइक रॅलीचा समारोप त्रिमूर्ती चौकात एक जाहीर सभेने करण्यात आला. आता या सभेसाठी भोंडेकरांनी स्टेज बांधण्याऐवजी ट्रॅक्टरला पसंती दिली. ट्रॅक्टरला लागलेल्या ट्रॉलीचा वापर सभेचे स्टेज म्हणून करण्यात आला होता. हे येथे सांगण्याचे कारण, की ट्रॅक्टर हे भोंडेकरांना ‘लकी’ ठरले आहे.

कारण या ट्रॅक्टर चिन्हावर अपक्ष लढून भोंडेकरांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीत एक लाख तीन हजार मतदान घेत तगडे प्रतिस्पर्धी तत्कालीन भाजप उमेदवार अरविंद भालाधरे यांना २३ हजार मतांनी पराभूत केले होते आणि आमदारकीची माळ गळ्यात घालून घेतली होती.

दरम्यान भोंडेकर यंदाची विधानसभा निवडणूक अपक्ष लढविणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यामुळे ते पुन्हा ट्रॅक्टर या आपल्या ‘लकी’ निवडणूक चिन्हाला पसंती देणार, यात शंका नाही. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने ओबीसी मतांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी सत्ता पक्षात असतानासुद्धा सरकारला घरचा आहेर देत बाइक रॅली काढली. दरम्यान त्यांच्या या रॅलीच्या समारोपप्रसंगी जाहिर सभा चक्क ट्रॅक्टरवर घेतली.

आमदार भोंडेकर आत्तापासूनच आपले निवडणूक चिन्ह ट्रॅक्टरचा प्रचार करत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कालचे बाईक रॅली आंदोलन ओबीसींच्या समर्थनार्थ असले तरी सहभागी झालेले बाइकस्वार हे ओबीसींपेक्षा शिवसैनिक जास्त असल्याचे दिसून आले. भोंडेकरानी आत्तापासून निवडणुकीची तयारी सुरु केली असली, तरी आजच्या बदलत्या राजकारणात त्यांना अजून मोठी मजल मारावी लागणार आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT