Navneet Rana_Raj Thackeray_Uddhav Thackeray 
विदर्भ

Navneet Rana: मजबुरी का नाम ठाकरे! नवनीत राणांनी उद्धव-राज यांना डिवचलं

Navneet Rana: महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत भाऊ एकत्र आले आहेत. अद्याप त्यांची राजकीय युती घोषित झालेली नाही पण कुटुंब म्हणून ते एकत्र जरुर आले आहेत.

Amit Ujagare

Navneet Rana: महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत भाऊ एकत्र आले आहेत. दोघांचे राजकीय पक्ष वेगळे असले तरी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ते आता एकत्र आले आहेत. अद्याप त्यांची राजकीय युती घोषित झालेली नाही पण कुटुंब म्हणून ते एकत्र जरुर आले आहेत. पण आता आगामी निवडणुकीसाठीच ते एकत्र आल्याचं त्यांचे विरोधक बोलू लागले आहेत. त्यातच आज अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनीही त्यांच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं असून 'मजबुरी का नाम ठाकरे' अशा शब्दांत त्यांनी उद्धव आणि राज यांना डिवचलं आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, "उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आज दीपोत्सव साजरे करत आहेत, दिवाळीची सुरुवात ते करत आहेत. पण यामध्ये फक्त एकच चांगली गोष्ट आहे ती म्हणजे दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र येतंय. पण लोक त्यांच्याकडं ज्या दृष्टीनं पाहत आहेत ते म्हणजे मजबुरी. म्हणजेच नाईलाजानं ते एकत्रित आले आहेत. देवाला प्रार्थना आहे की त्यांनी केवळ निवडणुकीपुरतं एकत्र न येता विचारांकरता एकत्र यायला हवं. केवळ निवडणुकीच्या तोंडावर नव्हे तर त्या ही खूप आधी त्यांनी एकत्र यायला हवं होतं. आपल्या विचारांसाठी जेव्हा राज ठाकरे त्यांच्यावर टीका करायचे, तेव्हा जर ते एकत्र आले असले तर तर त्यांच्यामध्ये मजबुरी दिसली नसती पण आता संपूर्ण महाराष्ट्र पाहात आहे की, मजबुरी का नाम ठाकरे परिवार!"

दरम्यान, दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मनसेच्यावतीनं दरसालाप्रमाणं नुकताच दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवाचं उद्घाटन राज ठाकरेंचे मोठे चुलत बंधु आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी दोन्ही ठाकरे कुटुंबिय एकत्र आले होते. त्यांच्या एकत्र येण्याची राज्यात बरीच चर्चा झाली. या ठाकरे कुटुंबाचे फोटोही व्हायरल झाले होते. दोन्ही ठाकरेंचे समर्थक अर्थात शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी तर ही मोठी पर्वणीच आहे. त्यामुळं येत्या काळातील राजकारणावरही ठाकरेंच्या एकत्र येण्याचे परिणाम दिसून येतील, असं काही जानकार लोक सांगतात.

त्यामुळं मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा होताच कदाचित शिवसेना-मनसे युतीची घोषणा देखील होऊ शकते. खरंतर शिवसेना आधीच महाविकास आघाडीमध्ये सामिल आहे ज्यात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष आहेत. या महाविकास आघाडीतच राज ठाकरेंच्या मनसेलाही सामावून घेण्यासाठी ठाकरेंची धडपड सुरु आहे. पण मनसेला सध्याच्या घडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेस इच्छुक नाही. कारण सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर जर परप्रांतियांच्याविरोधात भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंना सोबत घेतल्यास काँग्रेसला बिहारमध्ये फटका बसू शकतो. त्यामुळं राज ठाकरेंना तुर्तास तरी दम धरण्याचा सल्ला काँग्रेसकडून दिला जात असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT