Amravati News : दिवाळीच्या किराणा किट वाटपावरून सुरू झालेला भाजपमधील अंतर्गत वाद आता पुन्हा उफाळून आला आहे. भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी राणा दाम्पत्याच्या किराणा वाटपावर अप्रत्यक्षपणे टीका केल्यानंतर आता भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत टोला लगावला आहे. ‘कहते हैं ना... आजकल कुछ लोग दो बाल्टी पानी के तजुर्बे लेकर दरिया की गहराई नापने निकल पड़ते हैं...’ अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे. त्यामुळे अमरावतीत पोटे-पाटील विरुद्ध राणा दाम्पत्य यांच्यातील वादाची ठिणगी पुन्हा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आमदार रवी राणा आणि भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या संकल्पनेतून दरवर्षी दिवाळीनिमित्त गरजू आणि गरीब कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप केले जाते. यंदाही या उपक्रमांतर्गत तब्बल तीन लाख कुटुंबांपर्यंत दिवाळीचा किराणा पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला होता. या उपक्रमाचा शुभारंभ नवनीत राणा यांच्या हस्ते अमरावतीतील हनुमान नगर परिसरातून करण्यात आला होता. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही कुटुंबाचा दिवाळीचा आनंद हिरावला जाऊ नये, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे राणा दाम्पत्याकडून सांगण्यात आले होते.
राणा दाम्पत्याच्या या उपक्रमावर भाजप (Bjp) आमदार प्रवीण पोटे यांनी अप्रत्यक्ष टीका केली होती. "मदत ही हृदयातून झाली पाहिजे. मदत करताना त्यामागे राजकीय फायदा किंवा निवडणुकीतील मायलेज मिळविण्याचा दृष्टिकोन नसावा. मदत देताना दिल्या जाणाऱ्या बॅगेचे वजनही उचलता येणार नाही, अशी परिस्थिती नसावी, असा टोलाही त्यांनी लगावला होता. काही लोक आहे ना चारण्याचा माल आणि बाराण्याची पुंगी असा राहतो. म्हणून मला सांगण थोड गरजेच वाटते, असेही ते म्हणाले होते.
पोटे यांच्या या वक्तव्यानंतर आता नवनीत राणा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'कहते हैं ना... आजकल कुछ लोग दो बाल्टी पानी के तजुर्बे लेकर दरिया की गहराई नापने निकल पड़ते हैं..’ या हिंदी वाक्यातून त्यांनी कोणावरही थेट नाव न घेता निशाणा साधल्याचे दिसत आहे. हा टोला प्रवीण पोटे यांच्या टीकेला उत्तर म्हणून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे अमरावती भाजपमधील पोटे-पाटील आणि राणा दाम्पत्य यांच्यातील राजकीय मतभेद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.