Naxal Encounter in Gadchiroli. Sarkarnama
विदर्भ

Gadchiroli : स्फोटात 15 पोलिसांचे जीव घेणारा कसनसूर उपकमांडर दुर्गेश वट्टी धाडला यमसदनी

Naxal Encounter : महाराष्ट्र-छत्तीसगड सिमेवर पोलिस-माओवाद्यांची दीड तास चकमक; दोन ठार

प्रसन्न जकाते

Big Success : महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सिमेवर असलेल्या बोधीटोलाजवळ गुरुवारी (ता. 14) गडचिरोली पोलिस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत दुर्गेश वट्टी हा कट्टर माओवादी उपकमांडर ठार झालाय. त्याचा एक साथीदारही चकमकीत मारला गेलाय. 2019 मध्ये जांभुळखेडा येथे माओवाद्यांची भीषण स्फोट घडविला होता. त्यात गडचिरोलीतील 15 पोलिस शहीद झाले होते. या स्फोटाच्या मुख्य सूत्रधारांपैकी दुर्गेश हा एक होता. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी ही माहिती दिली.

छत्तीसगडमधील गोडलावही पोलिस स्टेशनपासून सुमारे 10 किलोमीटरवर असलेल्या मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील बोधीटोला येथे माओवादी मोठ्या प्रमाणावर जमले होते. येथुन ते पोलिसांवर घातक हल्ला करण्याच्या तयारीत होते. ही माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलिस, सी-60 कमांडो पथक आणि सीआरपीएफ बोधीटोलाच्या दिशेनं रवाना झाले.

बोधीटोलाजवळ पोलिस पोहोचल्यानंतर माओवाद्यांना त्याची चाहूल लागली. त्यामुळं त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. विशेष म्हणजे माओवाद्यांजवळ यावेळी एके-47 व सेल्फ लोडिंग रायफल (SLR) बंदुकीही होत्या. सुमारे दीड तास ही चकमक सुरू होती. ही माहिती कळताच पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अतिरिक्त कुमक बोधीटोलाच्या दिशेने रवाना केली. चकमकीत दुर्गेश आणि त्याचा एक साथीदार ठार झाले. दुर्गेश हा कसनसूर दलमचा उपकमांडर होता. जंगलातून पोलिसांनी दोन बंदूक, जीवंत काडतूसं, बॅग्ज, माओवादी चळवळीशी संबंधित साहित्य जप्त केले.

नीलोत्पल यांनी सांगितलं की, या मोहिमेसाठी गडचिरोली पोलिसांसह सी-60 कमांडोची चार पथकं पाठविण्यात आली होती. केंद्रीय राखीव पोलिस दलाची (CRPF) एक तुकडीही पोलिसांच्या मदतीसाठी गेली होती. दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास विशेष अभियानातील पथकं बोधीटोलाजवळ पोहोचल्यानंतर माओवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. पोलिसांसह काही आदिवासींवर हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. चकमकीत ठार झालेल्या दोन्ही माओवाद्यांचे मृतदेह हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं गडचिरोली पोलिस मुख्यालयात आणण्यात आलेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डिसेंबरच्या सुरुवातीलाच माओवाद्यांनी गडचिरोलील स्थापना सप्ताहादरम्यान अनुचित प्रकार घडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. पोलिसांनी तीन दिवसांपूर्वीच अर्जुन सम्मा हिचामी (वय 19, रा. झारेवाडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) या कट्टर माओवादी जनमिलिशियास अटक केली होती. एटापल्ली तालुक्यातील टिटोळा गावाचे पोलिस पाटील लालसू वेळदा यांच्या हत्येत त्याचा सहभाग होता. 20 नोव्हेंबर 2023 रोजी माओवाद्यांनी आदिवासी नेत्यांच्या मदतीनं तोडगट्टाजवळ पोलिसांना घेरलं होतं. त्यानंतर संपूर्ण एटापल्ली तालुक्यात कलम 144 लागू करण्यात आलं होतं. हा भागही छत्तीसगडला लागूनच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यावरून परतल्यानंतर माओवाद्यांनी एकापाठोपाठ हत्यासत्राला सुरुवात केली होती. अशातच पोलिसांना दुर्गेशच्या रुपानं मोठं यश मिळालय.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT