NCP in Rajura Sarkarnama
विदर्भ

Vidhan Sabha Politics : ‘फिल्डिंग’साठी अजितदादांचे शिलेदार ताकदीने भिडले

Rajura Constituency : विधानसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली.

संदीप रायपूरे

Chandrapur : महाराष्ट्राच्या राज्याच्या सीमेवर असलेली राजुरा विधानसभेची जागा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चंद्रपुरात पार पडलेल्या पक्षाच्या विविध कार्यक्रमात स्थानिक नेत्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातून आपल्या वाट्याला दोन विधानसभेच्या जागा देण्याची मागणी रेटून धरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व नेते राजेंद्र जैन चंद्रपुरात नुकतेच भेट देवून गेलेत. त्यावेळी आयोजित एका कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील तीन जागांवर काँग्रेसने विजय मिळविला होता. दोन जागांवर भाजप, तर एका जागेवर किशोर जोरगेवार यांच्या रूपाने अपक्ष आमदार विजयी झाले.

आता राज्यात एकनाथ शिंदे, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुतीची सत्ता आहे. भाजपसोबत हातमिळवणी केल्यांनतर अजित पवार हे आपल्या पक्षवाढीसाठी सक्रिय झाले आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचा डोळा भाजप ज्या ठिकाणाहून पराभूत झाला. त्या जागेवर आहे. जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाचे फारसे राजकीय वर्चस्व नाही. अशावेळी जिल्ह्यातील दोन विधानसभांच्या जागांवर उमेदवारी मिळविण्यासाठी स्थानिक नेते आतापासूनच कामाला लागले आहेत.

स्थानिक नेत्यांची पहिली पसंती राजुरा विधानसभेच्या जागेला आहे. राजुऱ्यातील काही भागात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती बऱ्यापैकी आहे. विधासभा क्षेत्रात त्यांचे अनेक नगरसेवकही आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रात सध्या काँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपकडून निवडणुकीत उभे असलेले माजी आमदार अॅड. संजय धोटे यांना पराभवाचा मोठा सामना करावा लागला. ते चक्क तिसऱ्या क्रमांकावर राहिले. हाच संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने आतापासूनच राजुरा विधानसभेची तयारी चालविली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते राजुऱ्यात भाजपचे कार्यालय उघडण्यात आले आहे. त्या माध्यमातून त्यांचे सेवा कार्य अविरत सुरू आहे. चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीसाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करीत आहे. स्थानिक नेते ‘अलर्ट मोड’वर आहेत. त्यातूनच नेत्यांचे चंद्रपूर दौरेही वाढले आहेत. गेल्या महिनाभरात पक्षाचे अनेक कार्यक्रम पार पडले. यावेळी स्थानिक नेत्यांकडून विधानसभेच्या दोन जागा पाहिजे, असा आग्रह करण्यात आला.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडत अजित पवार यांचा गट सत्तापक्षासोबत सहभागी झाला. त्यानंतर अनेक नवीन कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देण्याचा सपाटा राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रपुरात सुरू केला आहे. राजुरा विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनीही कामाला सुरवात केली आहे. विधानसभा क्षेत्रात त्यांनी कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. कोणत्याही स्थितीत विधानसभेच तिकीट आपल्याच वाट्याला येईल, ही मोठा आशा त्यांना आहे.

Edited by : Prasannaa Jakate

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT