Gram Panchayat Election in Bhandara Google
विदर्भ

Gram Panchayat Election : आली रे आली... भंडाऱ्यात अजितदादांची बारी, बीआरएसचीही बल्ले...बल्ले...

अभिजीत घोरमारे

Entry of New Political Party in Bhandara District : अनेक ठिकाणी झालेल्या चुरसपूर्ण सामान्यांमध्ये विजय खेचून आणल्यामुळं आमदार राजू कारेमोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा चांगला ‘टाइम’ भंडाऱ्यात कायम असल्याचा संदेश राज्यातील राजकीय वर्तुळात गेला. याशिवाय जिल्ह्यात तेलंगणातील भारत राष्ट्र समितीनंही स्थानिक निवडणुकीच्या माध्यमातून प्रवेश मिळविलाय. त्यामुळं सध्या भंडाऱ्यात अजित पवार गट आणि बीआरएसची ‘बल्ले.. बल्ले...’ आहे.

भंडारा जिल्ह्यातील ६४ ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक होती. त्यातील मोहाडी तालुक्यात ५७ ग्रामपंचायतीचा समावेश होता. या निवडणुकीत बीआरएस पक्षानं अनेक ठिकाणी बाजी मारली. ११ ग्रामपंचायतींमध्ये बीआरएसचे सरपंच निवडून आणले आहेत. विशेष म्हणजे बीआरएस नुकताच महाराष्ट्रात दाखल झालाय. (NCP Ajit Pawar Group wins in Bhandara District BRS opens account in Gram Panchayat Election)

माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात बीआरएसची जिल्ह्यात घोडदौड सुरू झालीय, असं सांगण्यात येतंय. मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू कारेमोरे (अजित पवार गट) यांच्या नेतृत्वात २५ ग्रामपंचायत काबिज करण्यात पक्षाला यश आलंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा भंडारा हा गृहजिल्हा आहे. मात्र, या जिल्ह्यातच काँग्रेसला केवळ नऊ ग्रामपंचायतींवर समाधान मानावं लागलं.

जिल्ह्यातील निवडणुकीचं चित्र बघता काँग्रेसचे आमदार नाना पटोले, भाजपचे खासदार सुनील मेंढे, माजी आमदार डॉ. परिणय फुके यांचा आगामी काळात चांगलाच कस लागणार आहे. भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध बीआरएस असा थेट सामना होता. काँगेस आणि भाजपची चर्चा त्यानंतर होत होती. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली, तेव्हापासून जिल्ह्यातील अनेक नेत्यांची धडधड वाढली होती. त्यात जिल्ह्यात काँग्रेसचं पानिपत झाल्यानं भाजपनं टीका केली. मात्र, भाजपही काँग्रेसपेक्षा केवळ एकाच जागेनं पुढे होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांच्या बीआरएस पक्षाला महाराष्ट्रातील दहा ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाल्यानं या पक्षाचे मनोबल आता महाराष्ट्र-तेलंगणातील सीमावर्ती भागातील गावांमध्ये निश्चित वाढणार आहे. काटेबाम्हणी ग्रामपंचायतीत सरपंचपदी नीतेश बांडेबुचे, धुसाळा ग्रामपंचायतीवर सरपंचपदी धोंडू खंडाते विजयी झाल्यानं बीआरएसचं मनोबल उंचावलं आहे. सध्या पक्षातील कार्यकर्ते गावागावांमध्ये जल्लोष करीत आहेत.

भंडारा जिल्ह्यातील निकाल

एकूण ग्रामपंचायत : ६६

मतदान झालेल्या ग्रामपंचायती : ६४

भाजप : १०

शिंदे गट : ००

ठाकरे गट : ००

अजित पवार गट : २५ (२ बिनविरोध )

शरद पवार गट : ०३

काँग्रेस : ०९

बीआरएस : ११

इतर : ०६

(Edited By : Prasannaa Jakate)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT