Amol Mitkari & Jitendra Awhad Sarkarnama
विदर्भ

NCP Politics : आमदार अमोल मिटकरींनी कुणाची केली रामायणातील मंथरेशी तुलना?

जयेश विनायकराव गावंडे

NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जहरी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांची रामायणातील मंथराशी तुलना करून मिटकरींनी आव्हाडांवर टीकेचे बाण सोडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवू पाहणारी व पवार परिवारात आग लावणारी कळव्यातील घाऱ्या निळ्या डोळ्याची (आगलावी ) मंथरा अशा शब्दांत मिटकरींनी आव्हाडांवर टीका केली आहे. नाव न घेता मिटकरींनी ही टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. पवार यांच्यावर टीका करताना ‘तुम्ही स्टेजवरुन नेहमी पळून जायचे. भाषणाची वेळ आली की नेमके तुम्ही बाथरुममध्ये असायचे. कारण तुम्हाला हिंदी बोलायला येत नाही. इंग्रजी बोलता येत नाही. हे तुमचे लिमिटेशन्स महाराष्ट्राला माहिती नव्हत्या. आता आम्हाला सांगावे लागेल’, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. या टिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात शीतयुद्ध सुरू झाले आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि अजितदादांचे कट्टर समर्थक अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना लक्ष करीत त्यांच्यावर टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अतिशय खोचक शब्दात मिटकरींनी आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले आहे. मिटकरींनी आव्हाड यांची तुलना रामायणातील ‘मंथरा’ या पात्राशी केली आहे. यापूर्वीही मिटकरींनी जितेंद्र आव्हाड हे चळवळीच्या नावावर भामटेगिरी करणारे व्यक्ती आहेत, असे म्हणत आम्ही तुमच्या विधानाला तुमच्याच भाषेत उत्तर देऊ, असे आव्हान दिले होते. त्यानंतर आता पुन्हा मिटकरींनी आव्हाडांवर जहरी टीका केली आहे. ट्विट करीत मिटकरींनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर ही टीका केली आहे.

प्रभू श्रीरामाला ज्यांच्यामुळे वनवास भोगावा लागला, त्या कैकेयीने मंथरा हिच्या सांगण्यावरून हे केले होते. हे रामायणात आहे. आता याच मंथरा पात्राशी तुलना आमदार अमोल मिटकरींनी जितेंद्र आव्हाड यांच्याशी केली आहे. आपल्या जहरी टीकेचा प्रहार करीत आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेस संपवित आहेत. त्यांनी पवार घरण्यातही आग लावली असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे. नाव न घेता मिटकरींनी आव्हाड यांच्यावर ही टीका केली आहे.

अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी रामायणातील एका व्हिडीओसह आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘ही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवू पाहणारी व पवार परिवारात आग लावणारी कळव्यातील घाऱ्या निळ्या डोळ्यांची (आगलावी ) मंथरा! फक्त त्रेतायुगात तिचा डावा डोळा निकामी होता आता दोन्ही विषारी डोळ्यांनी ही थेट कलियुगात परिवार फोडायला निघाली आहे .ओळखा पाहू कोण?’ असा सवाल विचारत नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांना मिटकरींनी लक्ष्य केले आहे. आता मिटकरींच्या या विधानावरून दोन्ही गटात आणखी वाद वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT