Shekhar sawarbandhe  Sarkarnama
विदर्भ

Nagpur Ncp News : राष्ट्रवादीच्या सावरबांधेंना काँग्रेसची ऑफर मात्र...

Rajesh Charpe

Nagpur News : नागपूर शहराचे माजी उपमहापौर, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान प्रदेश सचिव शेखर सावरबांधे पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीसाठी सक्रिय झाले आहेत. काँग्रेसच्यावतीने पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी त्यांच्या नावाचा विचार सुरू आहे. त्यांना काँग्रेसने पक्ष प्रवेशाची ऑफर दिली आहे. मात्र यापूर्वी अनेकदा तोंड पोळल्याने ते आता ताकही फुंकून पित आहेत. आधी उमेदवारी जाहीर करा नंतर पक्ष प्रवेश करतो, अशी अट त्यांनी ठेवली असल्याचे समजते.

शेखर सावरबांधे मूळचे काँग्रेसचे (Congress) आहेत. अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांसोबत पटले नाही. विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना तत्कालीन महापालिकेचे आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता. विलासराव देशमुख यांनी आयुक्तांची बाजू घेतल्याने सावरबांधे नाराज झाले होते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

शिवसेना (Shivsena) -भाजपची युती असताना पूर्व नागपूरमधून विधानसभेची निवडणूक लढले होते. काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यासोबत त्यांचा कडवा मुकाबला झाला होता. भाजपच्या एका नेत्याने बंडखोरी करून बसपाच्या हत्तीवर निवडणूक लढल्याने त्यांचा विजय थोडक्यात हुकला होता. त्यानंतर भाजपने पूर्व नागपूर आपल्याकडे घेतले आणि शिवसेनेला दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघ देण्यात आला.

त्यावेळी सावरबांधे यांची दक्षिणमध्ये चांगलीच हवा होती. तेच निवडून येईल, अशी अपेक्षा युतीतील सर्वच नेत्यांना वाटत होती. शेखर सावरबांधे यांना शिवसेनेने उमेदवारीचा शब्द दिल्याने त्यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली होती. बॅनर, पोस्टर छापले होते. फक्त उमेदवारी अर्ज भरणे एवढेच शिल्लक राहिले होते. मात्र रात्रभरात चित्र बदलले. त्यांच्या ऐवजी किशोर कुमेरिया यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

शेखर सावरबांधे यांची समजूत काढण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे त्यांच्या घरी येऊन गेले. पुढल्या निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल, असा शब्द देण्यात आला. या आशेवर सावरबांधे शिवसेनेत कायम राहिले. 2014 च्या निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. युती आणि आघाडी तुटली, असे असतानाही सावरबांधे यांना शिवसेनेने तिकीट दिले नाही. त्यांच्या ऐवजी किरण पांडव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सावरबांधे यांचा संयम सुटला. त्यांनी बंडाचे निशान फडकावले.

शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा जादा मते घेऊन दाखवतो असे चॅलेंज त्यांनी नेत्यांना दिले होते. त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला मात्र विजय नोंदऊ शकले नाहीत. त्यानंतर सावरबांधे राजकारणापासून अलिप्त झाले होते. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून ते पुन्हा राजकीय प्रवाहात आले आहेत. सध्या ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत.

नागपूरमध्ये पवार गटाने एक जागा मागितली आहे. राष्ट्रवादीच्या यादीत सावरबांधे यांच्यासह शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचा समावेश आहे. दुसरीकडे काँग्रेसची पूर्व नागपूर सोडण्याच्या तयारी नाही. यावर तोडगा म्हणून उमेदवाराची अदलाबदली होऊ शकते अशी चर्चा आहे. यातून सावरबांधे यांचे नाव पुढे आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT