Anil Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Maharashtra Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजला ‘कोल पाइप कन्व्हेयर’चा मुद्दा

Anil Deshmukh : माजी गृहमंत्र्यांनी वेधले सरकारचे लक्ष. सातत्याने होणाऱ्या प्रदूषणाकडे वेधले मंत्र्यांचे लक्ष. उपयांची मागणी

Atul Mehere

Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘कोल पाइप कन्व्हेयर’चा मुद्दा गाजला आहे. पाहणी केल्यानंतर ‘पाइप कन्व्हेयर बेल्ट’मुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न थेट अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. यावर आता ऊर्जामंत्री व ऊर्जा विभाग कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. नागपुरातील खापरखेडा परिसरातील नागरिकांना मात्र या प्रदूषणामुळे तूर्तास दिलासा मिळाला आहे.

कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला लागणारा कोळसा आणण्यासाठी महानिर्मिती कंपनीने 443 कोटी 91 लाख रुपये खर्चून ‘कोल पाइप कन्व्हेयर’ प्रकल्प तयार केला आहे. पूर्वी रोप वे व रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून कोळसा पुरवठा करण्यात येत होता. आता नवीन ‘कोल पाइप कन्व्हेयर’ प्रणाली अस्तित्वात आल्यामुळे कोळसा थेट खाण ते वीज केंद्र असा पोहोचत आहे. कोळशाची वाहतूक आता अधिक जलद गतीने करण्यात येत आहे. मात्र, ‘कोल पाइप कन्व्हेयर’ प्रकल्प खापरखेडा परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. या प्रकल्पाच्या ध्वनिप्रदूषणामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. अनेकांना दुर्धर आजार जडले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ध्वनिप्रदूषणाची समस्या गंभीर असल्यामूळे राष्ट्रवादी काँग्रेस सावनेर तालुका प्रमुख कपिल वानखेडे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली होती. देशमुख खापरखेडा येथे आले असताना त्यांनी ‘कोल पाइप कन्व्हेयर’ प्रकल्पाची पाहणी केली. ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा गंभीर असल्यामुळे त्यांनी अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावर प्रश्न विचारण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या शब्दाप्रमाणे लक्षवेधी प्रश्नावलीमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला.

‘कोल पाइप कन्व्हेयर’ प्रकल्प ध्वनिप्रदूषणामुळे नागपुरातील कोराडी, चिचोली, खापरखेडा, चनकापूर परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली, यासंदर्भात ऊर्जामंत्री व ऊर्जा विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी देशमुख यांनी केली. अनिल देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे येणाऱ्या काळात ‘कोल पाइप’ ध्वनिप्रदूषणासंदर्भात ऊर्जा मंत्रालय व ऊर्जा विभाग काय निर्णय घेणार, याकडे खापरखेडा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT