Sharad Pawar News Sarkarnama
विदर्भ

Sharad Pawar News : फोडाफोडीच्या राजकारणावर पवार स्पष्टच बोलले; कुणी फोडाफोडी करणार असेल तर आम्ही भक्कम पणे...

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यावरुन अजित पवार यांनी वेळोवेळी स्पष्टीकरण दिले आहे. राज्याच्या राजकारणातील फोडाफोडीच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे.

शरद पवार आज (ता. 23) अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि ज्येष्ट नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

या वेळी पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. राज्यातले सरकार पाडले, सर्वोच्च न्यायालयाने जर 16 आमदारांना अपात्र ठरवले तर अजित पवार यांना फोडण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर पवार म्हणाले, ''उद्या कुणी फोडण्याची भूमिका घेत असले तर ती त्यांची भूमिका असले. मात्र, त्यावर आम्हाला काय भूमिका घ्यायची आहे, ती आम्ही भक्कम पणे घेऊ. मात्र, ती भूमिका काय असेल ते आताच सांगता येणार नाही. कारण या बाबात आम्ही चर्चाच केलेली नाही,'' असे पवार यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीतील नेते परस्पर विरोधात विधाने करत आहेत. यावरही पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, ''मी उद्योगपती गौतम अदानी यांच्या बाबतीत फक्त सांगितले की जेपीसीच्या मागणीने काही साध्य होणार नाही. कारण जेपीसीमध्ये साधारण 21 सदस्य असतात. त्यामध्ये १५ लोक भाजपचे असणार आणि ६ लोक विरोधकांचे असतील, समितीचा अध्यक्षही भाजपचा असेल. त्यातच या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेही समिती नेमलेली आहे. त्यामुळे मी सांगितले की जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समिती प्रभावी ठरेल. त्या संदर्भात मी मत मांडले. मात्र, विरोधी पक्षांनी जेपीसीची मागणी सुरुच ठेवली आहे. त्याला आमचा विरोध नाही, असेही पवार यांनी सांगितले.

विरोधी पक्षाची जी भूमिका आहे, ती आम्ही मान्य करु, विरोधकांच्या मागणीला मी विरोध करणार नाही. त्यांची जी भूमिका असेल त्या संदर्भात मी त्यांच्या सोबत असणार आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी पवार यांनी विदर्भातील शेतकऱ्यांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल, असे सांगितले.

शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे प्रश्न सोडण्यासाठी त्यांचे संघटन करण्याची गरज असल्याचेही पवार म्हणाले. एकेकाळी शेतकरी नेते शरद जोशी यांचे काम मोठे होते. मुंबईमध्ये गिरणी कामगारांचेही संघटन होते, त्यांच्यासाठी अनेक नेते लढत होते. पुन्हा त्याच पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT