NCP Vs Mahayuti : राज्यातील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या महायुतीचं सरकार म्हणजे केवळ एक देखावा आहे. शिंदे, फडणवीस हेच सरकार चालवित आहेत. दोघेही अजितदादांना अत्यंत सुनियोजितपणे ‘साइड ट्रॅक’ करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.
विदर्भात येणाऱ्या युवा संघर्ष यात्रेच्या निमित्तानं अकोला येथे त्यांनी मंगळवारी (ता. 28) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (NCP Sharad Pawar Group's Leader MLA Anil Deshmukh Says Eknath Shinde & Devendra Fadnavis Are Side Tracking Ajit Pawar)
महायुतीमध्ये अजितदादांचं मोठं खच्चीकरण सुरू आहे. प्रत्येक निर्णयाच्या वेळी अजित पवार यांना हे दोन्ही नेते एका बाजूला का काढतात, हे कळेनासं झालय. अलीकडेच दादांनी दिल्ली दौरा केला. अचानक ते दिल्लीला गेल्यानं नेमकं काय चाललं असेल, याचा अंदाज केला जाऊ शकतो, असं देशमुख म्हणाले. सरकारमध्ये कुणाचाच पायपोस कुणाच्या पायात नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री करीत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकानं न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची नेमणूक केली आहे. सरकारनं नेमलेल्या या समितीवर सरकामधीलच मंत्री छगन भुजबळ आक्षेप घेतात याबद्दल आश्चर्य वाटते. भुजबळ यांच्यासारखे जबाबदार मंत्री अशी मागणी करूच कसे शकतात, असा प्रश्न आमदार अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. यावरून मंत्रिमंडळातच एकवाक्यता नाही, असे सिद्ध होतं असा दावा त्यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यातील कापूस-सोयाबीन उत्पादकांची स्थिती चिंताजनक आहे. कापसाला 14 हजार आणि सोयाबीनला 8 हजार भाव देण्याची मागणी आम्ही करीत आहोत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी केली आहे. परंतु सरकार या मुद्द्यावर बोलायला अजिबात तयार नाही, अशी टीका देशमुख यांनी केली. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांनी नेहमीच आग्रहाची भूमिका घेतली आहे. पवारांनी देशाचे कृषिमंत्री असताना केलेली कामं सगळ्यांनीच पाहिली आहेत. त्यामुळं त्यांनी काय केलं, हे विचारण्याचा हक्क कुणालाही नाही, असे देशमुख म्हणाले.
विदर्भातून जाणाऱ्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप 12 डिसेंबरला होत आहे. आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत हा समोराप होत आहे. नागपूर येथे हा कार्यक्रम होणार आहे. योगायोगानं याच दिवशी शरद पवार यांचा वाढदिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व शरद पवार यांच्यावर प्रेम करणारी मंडळी हा वाढदिवस साजरा करणार असल्याची माहितीही आमदार अनिल देशमुख यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.