Pravin Darekar and Prasad Lad, Eknath Shinde, Neelam Gorhe
Pravin Darekar and Prasad Lad, Eknath Shinde, Neelam Gorhe Sarkarnama
विदर्भ

Eknath Shinde : भाजप आमदारांनी घेरलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मदतीला नीलम गोऱ्हे आल्या धावून

सरकारनामा ब्यूरो

Pravin Darekar and Prasad Lad : नागपूर हिवाळी अधिवेशन अनेक मुद्यांनी गाजलं. अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. मात्र विधानपरिषदेत यावेळी एक अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. सत्ताधारी पक्षात असलेल्या भाजप आमदारांनीच मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या केलेल्या कोंडीवर मात्र ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळाले. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी भाजप आमदारांना खडे बोल सुनावले.'तुम्ही काय विरोधक आहात का? मुख्यमंत्र्यांना बोलू द्या,' असे म्हणत नीलम गोऱ्हे यांनी भाजप आमदारांना सुनावलं.

सभागृहात नेमकं काय घडलं होतं?

मुंबई महापालिकेच्या कूपर-भगवती रुग्णालयामध्ये २०० कोटींचा घोटाळा झाल्याचे सांगत यावर कारवाई करण्याची मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उत्तर देताना सांगितलं की याविषयाची माहिती घेऊन या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं सांगितलं. मात्र मध्येच भाजप आमदार प्रवीण दरेकर हे आक्रमक झाले.

तर त्यांच्याबरोबर प्रसाद लाड हे देखील आक्रमक होत त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली. २०० कोटींचा हा घोटाळा आहे. त्यामुळे माहिती कसली घेता? असा सवाल दरेकरांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला. मात्र दरेकर आणि प्रसाद लाड हे जास्तच आक्रमक झालेले पाहून निलम गोऱ्हे यांनी त्यांना खडे बोल सुनावले.

'तुम्ही विरोधी पक्षात आहात का?' असा सवाल करत गोऱ्हे यांनी दरेकर आणि लाड यांना सुनावलं. त्यामुळे भाजप आमदारांनी घेरलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मदतीला नीलम गोऱ्हे धावून आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, विधानपरिषदेमध्ये घडलेल्या या प्रसंगाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT