Assembly Election 2023 Google
विदर्भ

Assembly Election : ‘कमल’ की कमलनाथ? निवडीसाठी महाराष्ट्रातील सूनबाई मध्य प्रदेशात

अभिजीत घोरमारे

Bhandara Political News : अगदी काही दिवसांपूर्वी सासरच्या उंबरठ्यावर माप ओलांडून महाराष्ट्रात आलेल्या सूनबाई मध्य प्रदेशात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा माहेरी परतल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील सीमावर्ती गावांमध्ये सध्या हे चित्र बघायला मिळत आहे. आपल्या मुलींना दिवाळ सण आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करता यावा, यासाठी त्यांचे पालकही जावईबापूंसह मुलींना माहेरी घेऊन जात आहेत.

मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांसाठी १७ नोव्हेंबरला मतदान होत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये तुंबळ रणसंग्राम सुरू आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांनी शक्ती पणाला लावलीय. बुधवारी (ता. १५) सायंकाळी मध्य प्रदेशातील प्रचारतोफा थंडावल्या. आता मतदार ‘कमल की कमलनाथ?’ याचा फैसला करणार आहेत. (Newly Married Couples Returned From Bhandara to Villages In Madhya Pradesh for Assembly Election 2023)

भंडारा जिल्ह्याच्या शेजारी मध्य प्रदेश आहे. राज्यात विधानसभा निवडणूक होत असल्यानं सीमावर्ती गावात जोमानं प्रचार झाला. अनेक गावांमधील तरुणांचा अलीकडच्या काळातच विवाह झाला. यातील अनेक वधू मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी आहेत. नव्यानंच विवाह झाला असल्यानं महाराष्ट्रात सून म्हणून आलेल्या बहुतांश मुलींची नावे अद्यापही मध्य प्रदेशातील मतदार याद्यांमध्ये आहेत. अशात १७ नोव्हेंबरला मतदान होत असल्यानं सर्वच पक्षांसाठी एकूणएक मत महत्त्वाचं आहे. त्यामुळं मध्य प्रदेशातील पालक आपल्या मुलींना दिवाळ सण आणि मतदान या दोन्हीसाठी जावयांसह माहेरी घेऊन गेले आहेत.

काही राजकीय पक्षांनी तर अशा जोडप्यांसाठी प्रवासाचीही व्यवस्था केलीय. काहींनी जोडप्यांना प्रवास खर्च देऊ केलाय. त्यामुळं महाराष्ट्रातील सूनबाई सध्या मध्य प्रदेशात माहेरवाशीण झालेल्या बघायला मिळत आहेत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बपेरा, सिहोरा भागात विवाह संबंधांची जुनी परंपरा आहे. आजही ही परंपरा कायम आहे. सीमावर्ती गावांमध्ये मध्य प्रदेशातील मुली नांदायला येतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विवाहानंतर कालांतराने या नववधू माहेरच्या गावातील (मध्य प्रदेश) मतदार यादीतून नाव कमी करून सासरच्या गावातील (महाराष्ट्र) मतदार यादीत समाविष्ट करून घेतात. परंतु अगदी काही दिवसांपूर्वी विवाह झालेल्या मुलींनी अद्याप ही प्रक्रिया न केल्यानं त्यांची नावं मध्य प्रदेशातील मतदार यादीतच आहेत. अशा नववधूंची संख्याही मोठी आहे. त्यामुळं भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातून या नवविवाहिता सध्या माहेरी गेल्या आहेत. निवडणूक आणि दिवाळी यंदा एकत्र आल्यानं राजकीय पक्षही अशा नववधू व त्यांच्या पतींसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

त्यामुळं महाराष्ट्रातील सूनबाई व जावयांचा यंदाचा पहिला दिवाळी सण दणक्यात साजरा होताना बघायला मिळत आहे. यातील बहुतांश जोडपी लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी मध्य प्रदेशकडे रवाना झाले आहेत, तर अनेक जोडपी भाऊबीजेच्या निमित्तानं बुधवारी मध्य प्रदेशकडे रवाना झालीत. आता लोकशाहीचा उत्सव आटोपल्यानंतर या जोडप्यांना मध्य प्रदेशात घेऊन जाणारे राजकीय पक्षच त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणून सोडणार आहेत.

सीमावर्ती भागातील बपेरा (भंडारा) आंतरराज्य सीमेवर सध्या प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसत आहे. मध्य प्रदेशात जाणाऱ्या बसेस खचाखच भरल्या आहेत. मोवाड आंतरराज्य सीमा, तसेच भंडारा जिल्ह्यातून मध्य प्रदेशात जाणाऱ्या सर्व मार्गांवर नाकाबंदीही करण्यात आलीय. नाकाबंदीच्या ठिकाणी सर्वच वाहनांची कसून तपासणी केली जातेय.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT