Bazargaon Blast Spot. Sarkarnama
विदर्भ

Nagpur Blast : नऊ मृतकांची ओळख पटली; सोलर कंपनीत एनडीआरएफही दाखल

Solar Company : स्फोटामागील कारण अद्यापही अस्पष्ट, कंपनी व्यवस्थापनाची माहिती

प्रसन्न जकाते

Bajargaon Incident : बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत रविवारी (ता. 17) सकाळी झालेल्या भीषण स्फोटात मृत्यू झालेल्या नऊ जणांची ओळख पटली आहे. कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंग सुरू असताना हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी 2018 मध्येही कंपनीत स्फोट झाला होता. त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला होता. सुमारे सहा महिन्यांपूर्वी 2023 मध्येही कंपनीत स्फोटाची घटना घडल्याचा आरोप झाला होता.

नागपूर पासून जवळच असलेल्या या कंपनीत रविवारी झालेल्या स्फोटात 6 महिला व 3 पुरुषांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युवराज चारोडे (रा. बाजारगाव), ओमेश्वर मच्छीर्के (रा. चाकडोह, ता. नागपूर), मिता उईके (अंबाडा सोनक, ता, काटोल), आरती सहारे (रा. कामठी, ता. काटोल), श्वेताली मारबते (रा. कन्नमवार जि. वर्धा), पुष्पा मानापुरे (रा. शिराळा, जि. अमरावती), भाग्यश्री लोणारे (रा. भुज तुकुम जि. अमरावती), ऋमिता उईके (रा. ढगा, जि. वर्धा), मौसम पटेल (रा. मोहाडी, जि. भंडारा) ही मृतकांची नावे आहेत.

स्फोटानंतर एनडीआरएफचे पथक बाजारगावमध्ये दाखल झाले आहे. रासायनिक तज्ज्ञांच्या मदतीनं स्फोटामागील नेमक्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे. ही घटना कशामुळं घडली हे अद्याप अस्पष्ट आहे. संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी झाल्यानंतरच नेमकं काय झालं ते सांगता येईल, असं सोलर कंपनीचे सरव्यवस्थापक आशिष श्रीवास्तव यांनी सांगितले. पोलिस आणि चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना कंपनी व्यवस्थापन सहकार्य करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कंपनीतील ज्या भागात ही घटना घडली तेथे सुमारे 35 ते 40 श्रमिक काम करीत होते. शिफ्ट पद्धतीने कंपनीचे कामकाज चालते. मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांपैकी अन्य कुणीही जखमी झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. मृत्युमुखी पडलेल्या श्रमिकांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. पोलिसांनी सोलर कंपनीचा परिसर सील केला आहे. स्फोट झाला, त्याठिकाणी कुणालाही जाण्यास मनाई करण्यात आली आहे. 2018 मध्ये कंपनीत स्फोट झाल्यांनतर ग्रामस्थांनी कंपनीच्या परिसरात आंदोलन केलं होतं. हा पूर्वइतिहास पाहता गावातील पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

बाजारगाव अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रमुख गाव आहे. कंपनीतील स्फोटानंतर ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला. कंपनीत काम करणाऱ्या श्रमिकांना कामाचं ‘टार्गेट’ देण्यात येते, असा आरोप यावेळी करण्यात आला. कामाच्या तुलनेत मिळणारे वेतनही तुटपुंजे असल्याचं अनेक कामगारांच्या नातेवाईकांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे अत्यंत नीकटवर्तीय असलेले सत्यनारायण नुवाल हे या कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळं याप्रकरणी आता राजकारणाला सुरुवात झालीय.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT