Nirbhay Bano Protest Sarkarnama
विदर्भ

Nikhil Wagle Attack : सरकारच्या दडपशाहीविरुद्ध आझाद मैदानावर ‘निर्भय बनो’

सतीश हरिश्चंद्र येटरे

Yavatmal News : पुण्यात पत्रकार निखिल वागळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि विधिज्ञ असिम सरोदे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू झाले आहे. तिघांवरील हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असून, गृहमंत्री फडणवीस यांच्या प्रणित गुंडांचा हा हल्ला होता, असा आरोप आता होत आहे. या हल्ल्याच्या विरोधात आता आंदोलन सुरू झाले आहे.

विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून आता सरकारविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून निर्भय बनो ही चळवळ यवतमाळ येथे चालविली जात आहे. संविधान वाचविण्यासाठी ही चळवळ उभी राहिल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

पुण्यातील घटनेचा निषेध करण्यासाठी यवतमाळ येथील आझाद मैदानातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर निर्भय बनो आंदोलन करण्यात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचा, गृहमंत्र्यांचा धिक्कार करण्यात आला. सरकारच्या धोरणावर टीका करणारा पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ता किंवा आणखी कोणीही असो त्याला आम्ही सोडणार नाही, अशा प्रकारचा संदेश पुण्यातील हल्ल्यातून संपूर्ण महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न गृहमंत्र्यांच्या इशाऱ्याने झाल्याची टीका करण्यात आली.

पुणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. महाराष्ट्राचा बिहार, उत्तर प्रदेश करण्याचा हेतू यातून स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्रात पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते सुरक्षित नसतील तर सामान्य जनता कशी सुरक्षित राहील, हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला भेडसावत आहे. विरोधात बुलंद होणारा आवाज हेच खरे लोकशाहीचे यश असते. मात्र, आमच्या विरोधात कोणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्या व्यक्तीची जीभ हासडून टाकू अशा, प्रकारची भाषा बोलणारी आणि प्रत्यक्ष कृती करणारी गुंड प्रत्यक्षात सत्तेत आहेत, अशी टीका करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्र नासवण्याचे घोर कृत्य विविध घटना, प्रसंगांच्या निमित्ताने अधोरखित झाले आहे. अशा संविधानद्रोही सरकारला येत्या निवडणुकीत खाली खेचायला पाहिजे, अशा प्रकारचा सूर या निषेध आंदोलनात सहभागी असणाऱ्या सर्वांनी वक्तव्यातून व्यक्त केला. पुणे विद्यापीठातील ललित केंद्रात हल्ल्यानंतर झालेल्या तोडफोडीचा आणि प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या अटकेचा निषेधही करण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देऊन आणि सर्व धर्म समभावाची प्रार्थना घेऊन या सभेची सांगता झाली.

निषेध आंदोलनाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, अरुण राऊत, अशोक बोबडे, नंदू बुटे, पप्पू पाटील भोयर, साहेबराव जुनघरे, कैलास राऊत, विजय भुतडा, विपिन चौधरी, अनिल गायकवाड , सुरेश चिंचोळकर, अॅड. जयसिंग चव्हाण, अॅड. प्रवीण धुळधुळे, अॅड. युवराज मानकर, प्रा. घनश्याम दरणे, चंद्रशेखर कोलते, अमित सरोदे, प्रा. कल्पना राऊत, कौशिक साखरकर, अतुल पेंदोर यासह असंख्य मंडळी उपस्थित होती. निर्भय बनो चळवळीत सामील विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात ही चळवळ व्यापकपणे राबविण्याचा संकल्प केला. संविधान वाचविण्यासाठी ही चळवळ अधिक बळकट करण्याची प्रतिज्ञाही या वेळी घेण्यात आली.

गांधीजी आणि गैरसमज

सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या नेत्यांकडून कधी महात्मा गांधी यांना अभवादन केले जात होते. मात्र, त्याच नेत्यांकडून महात्मा गांधी यांच्याबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत. त्यामुळे महात्मा गांधी यांचे कर्तृत्व, मोठेपण, त्यांची विचारधारा, त्याग याबाबत जागृती करण्याचा संकल्पही निर्भय बनो चळवळीच्या माध्यमातून केला जाणार आहे. गांधीजी आणि गैरसमज याबाबत पोस्टरच्या माध्यमातून घराघरांत व जनसामान्यात गांधी विचारधारा पोहाेचवली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT