Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ही सलग तिसरी लोकसभेची निवडणूक आहे. या वेळी त्यांना हॅट्ट्रिक साधण्याची संधी आहे. त्यांच्या पहिल्या लोकसभेच्या (2014) निवडणुकीपेक्षा दुसऱ्या (2019) निवडणुकीत त्यांचे मताधिक्य घटले होते. या वेळी त्यांना विजयाची हॅट्ट्रिक साधण्यासह मताधिक्यातील घट भरून काढण्याचीदेखील संधी आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचा समावेश नसल्याने मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. मोदी- शाह यांच्या धक्कातंत्राच्या राजकारणामुळे वेगवेगळ्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. उद्धव ठाकरे यांनी गडकरींना थेट त्यांच्या शिवसेनेत येण्याचे जाहीर निमंत्रण दिले होते. काँग्रेसनेही टीकेची संधी सोडली नव्हती. त्यामुळे भाजपच्या दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गडकरी यांचे नाव जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
पहिल्या निवडणुकीत नितीन गडकरी यांनी माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांचा सुमारे पावणेतीन लाखांच्या मताधिक्याने पराभव केला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत मुत्तेमवार यांनी नागपूरमधून उमेदवारीच मागितली नाही. त्यांच्या ऐवजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लढले होते. त्यांचाही सुमारे सव्वा दोन लाख मतांच्या फरकाने पराभव झाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नाना पटोले यांनी या वेळी नागपूरमधून लोकसभेची निवडणूक लढणार नाही, हे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेसचा नवा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान आज झालेल्या काही घडामोडींनंतर नागपूरचे माजी महापौर, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे. असे झाल्यास ठाकरे गडकरींना चांगली लढत देतील, असे जाणकारांचे मत आहे.
भाजपची सर्वत्र ५१ टक्के मते घेण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, नितीन गडकरी यांनी सरासरी ५५.६१ टक्के मते घेऊन यापूर्वीच भाजपला ५१ टक्क्यांच्या पुढे नेऊन ठेवले आहे. मात्र मुत्तेमवारांच्या तुलनेत पटोले यांच्या विरुद्ध गडकरी यांचे मताधिक्य सुमारे ७० हजार मतांनी घटले होते. पटोले लढले तेव्हा ते प्रदेशाध्यक्ष नव्हते. ते नागपूरचेसुद्धा नाहीत. असे असताना त्यांना साडेचार लाखांच्या जवळपास मते मिळाली होती. ही काँग्रेससाठी जमेची बाजू आहे.
लोकसभा निवडणूक २०१९ (उमेदवार व मिळालेली मते)
नितीन गडकरी (भाजप)
६ लाख ६० हजार २२१
नाना पटोले (काँग्रेस)
४ लाख ४४ हजार २१२
निवडणूक २०१४
नितीन गडकरी (भाजप)
५ लाख ८७ हजार ७६७
विलास मुत्तेमवार (काँग्रेस)
३ लाख २ हजार ९१९
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.