Nitin Gadkari with Others Sarkarnama
विदर्भ

Nitin Gadkari News : शिवारफेरी मंत्र्यांसाठी की शेतकऱ्यांसाठी? पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांमध्ये रोष !

Akola Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University : शिवारफेरी मंत्र्यासाठी की शेतकऱ्यांसाठी, असा सवाल शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

जयेश विनायकराव गावंडे

Akola District Political News : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे आजपासून तीनदिवसीय शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या शिवारफेरीच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ही शिवारफेरी मंत्र्यांसाठी की शेतकऱ्यांसाठी, असा सवाल शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. (A question has been raised by the farmers whether for the Shiwar ferry minister or for the farmers)

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत आजपासून (ता. २९) पुढील तीन दिवस शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवारफेरीचे उद्घाटन केंद्रीय परिवहन आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. या शिवारफेरीत विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना सापत्न वागणूक दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अनेक शेतकऱ्यांनी माध्यमासमोर विद्यापीठाच्या नियोजनांवर ताशेरे ओढले.

तीन दिवस वेगवेगळ्या जिल्ह्यांतील शेतकरी...

कृषी विद्यापीठात आयोजित शिवारफेरीत तीन दिवस विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील शेकडो शेतकरी सहभागी होणार आहेत. आज पहिल्या दिवशी अकोला, वाशीम, बुलडाणा व अमरावती या जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने शेतकरी शिवारफेरीत सहभागी झाले होते. या वेळी सहभागी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाचा कारभार नियोजनशून्य असल्याची टीका केली आहे. यापूर्वी शिवारफेरी दरम्यान विद्यापीठाच्या वेगवेगळ्या पिकांच्या संशोधन केंद्रांवर जाऊन शेतकऱ्यांना पिकांची माहिती दिली जात होती.

यावर्षी गहू संशोधन विभागाचे २० एकर प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी खरीप पिकांचे विविध जातींचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहे. पहिल्या दिवशी आलेल्या शेतकऱ्यांना मंत्र्यांच्या आगमनामुळे काहीच पाहायला मिळाले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आल्याने प्रात्यक्षिकाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. या ठिकाणाहून शेतकऱ्यांना पोलिसांनी सभा ठिकाणी जाण्यास भाग पाडले. त्यामुळे ही शिवारफेरी कुणासाठी, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला.

गडकरींनी केली संशोधित पिकांची पाहणी...

शिवारफेरीच्या उद्घाटनापूर्वी गडकरींनी शिवार पाहणी व विविध पीक प्रात्यक्षिकांचे अवलोकन करून तज्ज्ञांकडून विविध पिकांवरील संशोधनाची माहिती घेतली. या वेळी त्यांनी वेगवेगळ्या पिकांच्या जातीच्या संशोधनाची पाहणी केली. त्यांच्यासोबत या वेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे हेसुद्धा उपस्थित होते. शिवारफेरीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिक पाहणी ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचा आरोप केला.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT