Nitin Gadkari Sarkarnama
विदर्भ

नितीन गडकरी म्हणाले; काळे झेंडे जरूर दाखवा, पण योग्य ठिकाणी...

मी तर ठेकेदाराला काम देऊन चुकलो आहे. वनविभागाचे अधिकारी त्यांना काम करू देत नाहीत. त्यामुळे निदर्शने तेथे जाऊन करा, असे गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर ः भंडाऱ्यातून (Bhandara) पवनीकडे जाणाऱ्या ५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम रखडले आहे. कारण वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ते काम अडवून धरले आहे. येताना मला काही लोकांनी काळे झेंडे दाखवले. ते कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. काळे झेंडे दाखवले याचे मला दुःख नाही. पण त्यांनी चुकीच्या माणसाला दाखवले. कारण महाराष्ट्रात (Maharashtra) वनमंत्री हे मुख्यमंत्री (Chief Minister) आहेत आणि राज्य कॉंग्रेसचेही आहे. त्यामुळे त्यांनी त्यांना झेंडे दाखवावे, अशी माझी त्यांना विनंती आहे, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी आंदोलकांना दिला.

येथील वनविभागाचे (Forest Department) डीएफओ आणि इतर अधिकाऱ्यांची नावं मी मागितली आहेत. तीन-तीन वर्ष जे लोक काम करत नाही, अशा लोकांच्या कार्यालयावर जाऊन तुम्ही नक्कीच निदर्शने करा. तुम्ही त्यांना काळे झेंडे दाखवले, तर नक्कीच त्या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम होईल, असे गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. काळे झेंडे दाखवा, निदर्शने करा, पण योग्य ठिकाणी करा. कारण मी तर ठेकेदाराला काम देऊन चुकलो आहे. वनविभागाचे अधिकारी त्यांना काम करू देत नाहीत. त्यामुळे निदर्शने तेथे जाऊन करा, असे गडकरी म्हणाले.

आज भूमिपूजनासाठी भंडारा येथे आले असताना ते बोलत होते. यावेळी मंचावर खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी खासदार शिशुपाल पटले, शिवराम गिरीपुंजे, केशवराव मानकर. माजी आमदार बाबा काशीवार, माजी आमदार हेमकृष्ण कापगते, माजी आमदार रामचंद्र अवसर, जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलिस अधीक्षक वसंत जाधव, एनएचएआयचे सीजीएम आशीष असाटी आदी उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून भंडाऱ्याच्या रिंगरोड करिता खासदार सुनील मेंढे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. माझ्यामागे ते सतत लागले. आज या कामाला मंजुरी मिळाली. लवकरच हे काम सुरू होत आहे. या प्रकल्पावर १०० कोटी रुपये भूमी अधिग्रहणासाठी खर्च झालेले आहेत. ३४१ कोटी रुपयांचा हा रस्ता आहे. यावर अनेक पुल, अंडरपास आहेत. शहरातून जो राष्ट्रीय महामार्ग जात होता, त्यामुळे शहरवासीयांना अडचणीचा सामना करावा लागत होते. वैनगंगा नदीवरचा जुना पूल महाराष्ट्रात मंत्री असताना मलाच बांधण्याची संधी मिळाली होती. राम आस्वले तेव्हा आमदार होते. डॉ. कापगतेंना ते आठवत असेल, अशी आठवण गडकरींनी सांगितली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT