Nitin Gadkari with Nagraj Manjule Sarkarnama
विदर्भ

नितीन गडकरी म्हणाले, नागराज मंजुळेंना मी प्रशस्तिपत्र देण्याची गरज नाही...

छोट्या कलाकारांना ही मोठी संधी नागराज मंजुळे यांनी दिली, हे कलाकार आता चांगलं नाव कमावतील, असा विश्‍वास नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर ः नागराज मंजुळे यांनी झोपडपट्टीतल्या मुलांना घेऊन झुंड हा सिनेमा तयार केला. झुंड ही फार सुंदर कलाकृती आहे. लोकांना हा सिनेमा नक्कीच आवडेल. आज त्यांनी छोट्या कलाकारांना ही मोठी संधी दिली, हे कलाकार आता चांगलं नाव कमावतील, असा विश्‍वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे काल नागपुरात (Nagpur) भरगच्च कार्यक्रम होते. त्यातूनही वेळ काढून त्यांनी झुंड (Jhund) हा सिनेमा बघितला आणि नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, नागराज मंजुळे हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. सैराट सारखे चांगले सिनेमे त्यांनी केलेले आहेत. त्यांना मी प्रशस्तिपत्र देण्याची गरज नाही. यापूर्वीच फिल्म इंडस्ट्रीने त्यांना त्यांच्या कुशलतेचे प्रमाणपत्र दिलेले आहे. त्यामुळे यापुढेही ते प्रेक्षकांपुढे अशाच किंबहुना यापेक्षाही सुंदर कलाकृती ते घेऊन येतील. नागराज मंजुळे यांनी आऊट ऑफ बॉक्स विषय घेतला आणि या विषयावर त्यांनी स्वतःचं पूर्ण कौशल्य वापरून झुंड निर्माण केला.

झोपडपट्टीतील तमाम शोषित, वंचितांमध्ये फुटबॉल क्रांतीची प्रेरणा निर्माण करणारे प्रा. विजय बारसे यांच्या आयुष्याची झुंड ही कथा आहे. त्यांची व्यक्तिरेखा अभिनयाचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे. नागपुरातील विशी-पंचविशीच्या उंबरठ्यावरची शेकडो तरुण मुलं व्यसनांच्या विळख्यात सापडलेली आहेत. रात्री चौकात बसून झिंगणारी ती मुले होती. त्यांचं आयुष्य एका बंदिस्त चौकटीतील होते. परंतु नागपुरात नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड' चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली, आणि चौका-चौकात ‘नाइट लाइफ’ जगण्याचा मनसोक्त आनंद लुटणाऱ्या या मुलांना अभिनय करण्याची संधी मिळाली. यामुळे त्यांच्या आयुष्याचा कॅनव्हास बदलला.

नागपूरच्या झोपडपट्टीतील मुले...

मोहननगर, गड्डीगोदाम, गिट्टीखदान, काश्मिरी गली, गोलबजार भागात कधीकाळी झिंगत असलेल्या विविध तरुण मुलांना जगण्याची नवीन दिशा झुंड मुळे मिळाली. बारसे आणि मंजुळे नागपुरातील झोपडपट्टीतील मुलांसाठी स्लम सॉकरचे प्रणेते ठरले, हे नक्की. विशेष असे की, नागपुरातील अंकुश गेडाम यांच्यासारख्या शेकडो कलावंतांना यातून एक नवी प्रेरणा मिळाली असून नागपुरात कलानगरी स्थापित व्हावी, यासाठी प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT