Nitin Raut
Nitin Raut Sarkarnama
विदर्भ

Nitin Raut News : नितीन राऊतांची गैरहजेरी खटकली, दोन दिवसांपूर्वी केली होती भाजप नेत्यांची स्तुती !

सरकारनामा ब्यूरो

Mahavikas Aghadi's Vajramuth Sabha News: महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला कॉंग्रेस नेते माजी मंत्री आमदार नितीन राऊत यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. नितीन राऊत यांच्या ‘होम पिच’वर विराट सभा होत असताना त्यांची गैरहजेरी खटकली. (Nitin Raut's absence became a topic of discussion)

अनेक दिवसांपासून सुनील केदार यांच्या नेतृत्वात वज्रमूठ सभेच्या आयोजनाची तयारी सुरू होती. याबाबत कॉंग्रेसच्या अनेक बैठका झाल्या. यातही नितीन राऊत यांनी हजेरी लावली नाही. तेव्हापासूनच त्यांच्या सभेत उपस्थितीबाबत शंका घेतली जात होती. भाजपच्या नेतृत्वातील सरकारतर्फे आयोजित कार्यक्रमात ते कधी दिसत नव्हते. परंतु नुकतेच त्यांनी उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब कन्वेंशन सेंटरच्या लोकार्पण समारंभात हजेरी लावली.

कन्वेंशन सेंटरच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. राऊतांनी स्तुती केली. तर उभय नेत्यांनी डॉ. राऊत यांचीही स्तुती केली. वज्रमूठ सभेला विदर्भच नव्हे तर राज्यातील राष्ट्रवादी, कॉंग्रेस व सेना उद्धव ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. परंतु डॉ. नितीन राऊत यांनी नागपुरातच झालेल्या या सभेला पाठ दाखवली.

कॉंग्रेसने (Congress) त्यांना मंत्रिपद दिले. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये सर्वात पहिले त्यांनी शपथ घेतली होती. पक्षाने त्यांच्यासाठी एवढे काही केले असताना तसेच पक्षासाठी डू ऑर डाय अशी परिस्थिती असताना नागपुरात (Nagpur) झालेल्या महत्त्वाच्या सभेत नितीन राऊत (Nitin Raut) अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

याबाबतीत जाणून घेण्यासाठी डॉ. राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ते भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याची माहिती मिळाली. वज्रमूठ सभेपेक्षा भंडारा जिल्ह्याचा दौरा महत्वाचा होता, असाही प्रश्‍न सभास्थळी चर्चिला गेला. खरे पाहता या सभेचे आयोजन करण्याची डॉ. राऊत यांची इच्छा होती. पण त्यांना ही संधी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज होते.

संधी मिळाली नाही, येथपर्यंत ठीक होते. पण आयोजनाच्या बैठकांमध्ये त्यांना निमंत्रित केले गेले नाही, अशीही माहिती आहे. त्यामुळे त्यांची नाराजी वाढली. म्हणून त्यांनी स्वतःहून एकाही बैठकीला हजेरी लावली नाही. ते येणार नाहीत तर त्यांचे चिरंजीव कुणाल राऊत सभेला येतील का, याबाबत माहिती घेण्याचाही प्रयत्न माध्यमांनी केला. पण त्यावरही समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. सभेला अनुपस्थित राहून डॉ. राऊतांना काय संदेश द्यायचा आहे, याची चर्चा आता रंगली आहे आणि भाजप नेते गडकरी व फडणवीस यांच्या स्तुती करण्याशी त्याचा संबंध जोडला जात आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT