Nagpur News, 23 July : विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व्हे करणे सुरू केलं आहे. नागपूर शहरातील उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाला मात्र सर्व्हेतून वगळण्यात आले आहे.
यावरून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंध शिंदे सेनेसाठी सोडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू आहे. शिंदे सेनेसोबत असलेले पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांना येथून लढण्यासाठी विचारणा झाली असल्याचे समोर आले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) उमेदवार विकास ठाकरे यांना उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाने सर्वाधिक मताधिक्य दिले होते. दुसरीकडे सर्वच मतदारसंघातून आघाडी घेणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मागील निवडणुकीपेक्षाही कमी मतदान झाले.
संविधान बदलणार या नरेटिव्हने बसपाचीही येथून पिछेहाट झाली आहे. हे सर्व निकाल बघून भाजप (BJP) धास्तवली आहे. हा मतदारसंघ गमावल्याची भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्व्हेलाच हा मतदारसंघ टाकण्यात आला नसावा असा कयास लावला जात आहे. महायुती असल्याने भाजपला शहरातील एक मतदारसंघ शिंदेंसाठी सोडावा लागणार आहे.
उद्धव सेनेसोबत युती असताना दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघ सेनेसाठी सोडण्यात येत होता. आजवर शिवसेनेला एकदाही हा मतदारसंघ जिंकता आला नाही. दक्षिण नागपूरमध्ये भाजपचे मोहन मते आमदार आहेत. त्यामुळे भाजपला शिंदे सेनेला दुसऱ्या मतदारसंघाचा पर्याय द्यावा लागणार होता. हे बघून उत्तर नागपूर सोडण्याची तयारी भाजपची असल्याचे समजते.
पीपल्स रिपब्लकीन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष लॉंग मार्चचे प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे आहेत. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात त्यांनी केलेल्या संघर्षाचा मोठा वाटा आहे. आंबेडकरी समाजात कवाडे यांना मानाचे स्थान आहे. हे बघून त्यांचे पुत्र जयदीप कवाडे यांचे उत्तर नागपूरचे उमेदवार म्हणून नाव समोर करण्यात आले आहे.
माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत उत्तर नागपूरचे आमदार आहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या डॉ. मिलिंद माने यांनी त्यांना पराभूत केले होते. मात्र, या निवडणुकीत बसपाने केलेल्या मत विभाजनचा मोठा वाटा होता. त्यानंतर झालेल्या 2019 च्या निवडणुकीत पुन्हा राऊत निवडून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.