Chandrapur Crime Sarkarnama
विदर्भ

Political Crime : शिवा वझरकर हत्याकांडाने राजकीय क्षेत्रातील माफियागिरीचे दर्शन

Murder Case : चंद्रपुरात का रंगत आहे खुनी खेळ; राजकीय गुन्हेगारांवर वचक गरजेचा

संदीप रायपूरे

Chandrapur News : कुलथा घाटावर सरपंच, तंटामुक्त अध्यक्षावर झालेला प्राणघातक हल्ला अन् आता एका युवा शिवसेनेच्या नेत्याची थेट हत्या करण्यापर्यंतची गुन्हेगारांनी मारलेली मजल अशा घटनांमुळे समाजमन सुन्न झाले आहे. किरकोळ कारणावरून शिवाची हत्या करण्यात आल्याचे पोलिस सांगत असले, तरी यामागे राजकीय माफियागिरीतून आलेली शक्ती कारणीभूत आहे.

चंद्रपुरातील सहकारनगर भागात 25 जानेवारीला शिवा वझरकर या 25 वर्षीय तरूणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. शिवा हा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा युवासेना शहर प्रमुख होता. या हत्याकांडात आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचा जिल्हा वाहतूक सेना प्रमुख स्वप्नील काशीकर याचाही या आरोपीत समावेश आहे.

स्वप्नील काशीकरचा इतिहास गुन्हेगारीयुक्त राहिला आहे. स्वप्नील आधी भारतीय जनता पार्टीत होता. त्यावेळी वनअधिकाऱ्याची बंदूक हिसकवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यांनतर भाजपने त्याची हकालपट्टी केली. राजकीय पक्षाशिवाय आपल्याला बळ मिळणार नाही, याची जाणीव असल्याने काशीकरने शिवसेनेचा मार्ग धरला. गुन्हे दाखल असतानाही त्याला जिल्हा वाहतूक सेना प्रमुखपद देण्यात आले.

वाहतूक सेनेत आल्यानंतर त्याच्या गुन्ह्यांची मालिका वाढतच गेली. कुलथा घाटावर सरपंच व तंटामुक्त अध्यक्षावर त्याने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणानंतर तो फरार होता. नुकताच त्याला जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर पुन्हा त्याच्यातील खुनशी वृत्तीचे दर्शन शिवाच्या हत्येच्या निमित्ताने झाले. अद्यापही त्याला शिवसेनेतून काढण्यात आलेले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजकारणात यायचे, नेतेगिरी करायची. त्यातून भक्कम पैसा कमविण्यासाठी माफियागिरी करायची. गुन्हेगारी कृत्यातून आपला दबदबा कायम ठेवण्याचे वेड सध्या चंद्रपुरात बऱ्यापैकी वााढले आहे. अशा स्थितीत पोलिसांकडून कोणत्या कारवाईची अपेक्षा ठेवणार? हा प्रश्न आहे. चंद्रपुरात गेल्या काही वर्षांपासून राजकीय गुन्हेगारीचा ‘ग्राफ’ कमालीचा वाढला आहे. असे राजकीय गुन्हे रोखण्यात पोलिसांना सातत्याने अपयश येत आहे. राजकीय पाठबळामुळे गुन्हेगांराना ऊर्जा मिळत आहे.

चंद्रपुरात सुरू असलेला हा खुनी खेळ आता थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी पोलिसांना ‘फ्री हॅन्ड’ हवा आहे. राजकीय हस्तक्षेप त्यांना नको आहे. चंद्रपुरातील हत्याकांडानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वझरकर परिवाराची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी यावेळी त्यांच्यापुढे करण्यात आली. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनीही वझरकर कुटुंबाला भेट दिली. जोरगेवार यांनी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना याप्रकरणात कारवाई करण्याची सूचना केली. शिवा वझरकर हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आता आंदोलन होत आहे. त्यातून राजकीय गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी जोर धरणार आहे.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT