OBC Protest At Yavatmal. Sarkarnama
विदर्भ

Yavatmal OBC : शासनाच्या दुर्लक्षामुळं यवतमाळात ओबीसी उतरले रस्त्यावर

Maratha Reservation : सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध; मागण्यांसाठी घोषणाबाजी

सतीश हरिश्चंद्र येटरे

Protest For Justice : सरकारनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं. परंतु सरसकट कोणत्याही समाजाला ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी करण्यात येऊ नये, अशी मागणी आरक्षण समर्थनार्थ ओबीसींच्या महामोर्चात रविवारी (ता. 26) यवतमाळ येथे करण्यात आली. आझाद मैदानातून हा महामोर्चा काढण्यात आला.

महामोर्चात पश्चिम विदर्भातील सुमारे 50 हजारावर आंदोलक सहभागी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. ओबीसी महामोर्चाच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या एकजुटीचं दर्शन यावेळी घडविण्यात आलं. मराठा समाजाला कुणबी अथवा ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (OBC Leaders Demand At Yavatmal Not To Give Reservation To Maratha Community Under OBC Category Demands For Independent Maratha Reservation)

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये, मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्यात येऊ नये, ओबीसींसाठी प्रत्येक तालुक्यात वसतिगृह सुरू करण्यात यावे, जातीनिहाय जनगणना करावी या मागण्या आंदोलकांनी मोर्चातून केल्या. स्थानिक महात्मा फुले चौकातून निघालेला मोर्चा यवतमाळ शहरातील प्रमुख मार्गानं नेण्यात आला. मोर्चात सहभागी काहींनी महापुरूषांची वेषभूषाही केली होती. डफडी, ढोलताशा वादकांचे पथक, ओबीसी बांधवाकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा यावेळी लक्षवेधी ठरल्या.

मोर्चा यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळानं महसूल विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन दिले. आरक्षणाच्या विषयावर चर्चाही करण्यात आली. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवदेन दिल्यानंतर काही प्रमुख नेत्यांनी मोर्चाला संबोधित केलं. आगामी काळात जिल्ह्यातील आंदोलनाचं स्वरूप यावेळी ठरविण्यात आलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यवतमाळमध्ये निघालेल्या ओबीसी महामोर्चाचे संयोजक तथा ओबीसी आरक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वादाफळे यांनी मोर्चाला संबोधित करताना छत्रपती शाहू महाराज यांच्या विधानांचा संदर्भ दिला. ते म्हणाले, शेती हा तुकड्यांत विभाजित होणारा तोट्याचा व्यवसाय आहे. त्यामुळं तुमच्या जातीची माणसं, शासन, प्रशासन, उद्योग आणि व्यापारातील महत्वाच्या जागेवर पाठवावी लागतील. ओबीसी समाजानंही आपल्या समाजबांधवांना अशा पदांवर पाठविण्यासाठी पुढाकार घ्यावा. ओबीसी समाजाचं आरक्षण संपविण्यासाठी काही लोक प्रयत्न करीत आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ द्यायचे नसतील, तर समाजानं एकसंघ राहणं गरजेचं आहे. ओबीसींच्या आरक्षणात आता वाटेकरी नको आहे. असं झाल्यास आरक्षणाचा पूर्ण लाभ ओबीसींना मिळणार नाही. ओबीसींचा कोणत्याही प्रवर्गाला आरक्षण देण्याबाबत विरोध नाही. मात्र ओबीसींच्या सध्याच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT