Vidhan Bhavan Nagpur. Google
विदर्भ

Nagpur Assembly : अधिवेशन जवळ येतेय, जरा सतर्कतेने काम करा

Alert Mode : सर्वच विभागांतील अधिकाऱ्यांना मिळाले अलिखित आदेश

प्रसन्न जकाते

Winter Session Of Maharashtra Legislature : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला अद्याप काही दिवस शिल्लक आहेत. असं असलं तरी अधिवेशनाचा काळ जवळ येतोय, जरा सतर्कतेने काम करा, असे अखिलित आदेश विदर्भातील सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नागपूर येथे 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन होणार आहे.

अधिवेशनात कोणता मुद्दा गाजेल याचा नेम नाही. विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी तारांकित आणि अतारांकित प्रश्न, हक्कभंग प्रस्ताव आणि महत्वाच्या विषयांवर विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्याची तयारी चालविली आहे. कोणता विषय कोणत्या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शेकेल याचा नेम नाही. (Officer's Got Instruction To Work Carefully In View Of Winter Session Of Maharashtra Legislature Assembly At Nagpur)

हिवाळी अधिवेशनाच्या काळात अनेक लोकप्रतिनिधींचा रोष विविध विभागातील अधिकाऱ्यांवर असतो. यंदा अंतरवली सराठी येथे झालेला लाठीचार्ज, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यावर बीडमध्ये झालेला हल्ला, मराठा आणि ओबीसी आरक्षण, खासदार नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकूर व बच्चु कडु यांच्याबाबत केलेली विधानं, अकोल्यातील जातीय दंगल, पूर्व विदर्भातील धान खरेदी, बुलढाणा जिल्ह्यातील सोशल मीडियावरील आपत्तीजनक पोस्ट, विदर्भातील बलात्काराच्या घटनांवरून राजकारण तापत आहे. त्यामुळं विरोधी पक्षाचे आमदार गृह विभागाला घेरण्याच्या तयारीत आहेत. चहा न मिळाल्यानं शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना सोडून पळालेला नागपुरातील डॉक्टर असं मुद्दे गाजण्याची दाट शक्यता आहे. गडचिरोलीत लोहखाणींना विरोध होत आहे. सुमारे 250 दिवसांपेक्षाही अधिक कालावधीपासून येथे आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी अलीकडेच गडचिरोली पोलिसांना घेरलं होतं. हा मुद्दाही चर्चेला येण्याचे संकेत आहेत. भंडारा जिल्ह्यातील मंडईमध्ये तरुणीला पूर्ण विवस्त्र करीत नाचविण्यात आलं. पंचायत समितीचे सभापतीही एका कार्यक्रमात नृत्यांगनेवर पैसे उडवत नाचले. यासंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे संतापल्या आहेत. मंडईत वाढत चाललेली अश्लीलताही चर्चेचा विषय ठरणार आहे.

अकोला जिल्ह्यातून अकोला मनपाच्या मालमत्ता कराचा विषयही महत्वाचा ठरणार आहे. येथे स्त्यांची दूरवस्था, जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे चर्चेला येऊ शकतात. अलीकडेच दोन आमदारांनी यासंदर्भात ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. पीकविम्याचा मुद्दा संपूर्ण विदर्भात प्रलंबित आहे. अकोला, अमरावती येथे त्यासाठी तोडफोडही झाली आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार सध्या आमदार बच्चु कडु यांच्या रडावर आहेत. त्यावरही औपचारिक किंवा अनौपचारिक चर्चाही संभावित आहेत. ऐनवेळी आमदार कोणत्याही मुद्द्यावर चर्चेची मागणी करू शकतात. अशात आतापासून अधिवेशनाचा समारोप होईपर्यंत कोणतीही चूक होऊ देऊ नका, अशा सूचना सर्व विभागातील वरिष्ठांनी विदर्भातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिस, महसूल, आरटीओ, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य विभागाला तर अधिक सतर्क राहण्यास सांगण्यात आलंय. महायुती सरकारमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी आहे. त्यामुळं त्यांच्याच आमदारांकडून सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता तशी कमीच आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अन्य काही आमदार अधिवेशनात आक्रमक भूमिका घेतील यात शंकाच नाही. असं असलं तरी कोणता आमदार कशामुळं दुखावला असेल व ते कोणत्या मुद्द्यावर ऐनवेळी अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल याचा नेम नाही. त्यामुळे ‘अलर्ट’च राहा अशा सूचना अधिकाऱ्यांना मिळाल्या आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT