Sanjay Gaikwad & Sandip Shelke Sarkarnama
विदर्भ

Shiv Sena : संजय गायकवाडांना महाराष्ट्राचा यूपी, बिहार करायचा आहे का?

Buldhana News : विरोधकांनी मागितला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब. दबंगगिरी करणाऱ्या आमदाराला आवर घालण्याची मागणी

Fahim Deshmukh

Shiv Sena : बुलढाण्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून युवकाला शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता विरोधकांकडून गायकवाड यांच्या कृतीवर टीका केली जाते आहे. विरोधकांनी थेट राज्य सरकारवर निशाणा साधत महाराष्ट्राचा काय यूपी, बिहार करायचा आहे का, हे एक वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला सांगून टाकावे, अशी टीका केली आहे. सर्वसामान्यांना एक न्याय आणि दबंगगिरी करणाऱ्या आमदाराला दुसरा न्याय ही भूमिका योग्य नसल्याची टीका वन बुलढाणा मिशनचे संयोजक तथा बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून घोषित झालेले संदीप शेळके यांनी केली.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. शिवजयंतीच्या मिरवणुकीत संजय गायकवाड यांनी तरुणांना चामडी लोळेपर्यंत मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये आमदार गायकवाड हे युवकांना पोलिसांच्या लाठीने पायदळी तुडवत अमानुषपणे मारहाण करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिवजयंतीच्या मिरवणुकीत आमदार गायकवाड यांनी आपल्या बॉडीगार्डची काठी घेऊन युवकांना बेदम मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे आमदार संजय गायकवाड मारहाण करत असताना पोलिस कर्मचारीही उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामुळे आता विरोधकांकडून टीका केली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वन बुलढाणा मिशनचे संयोजक संदीप शेळके म्हणले की, आम्ही जेव्हा महिलांचा एक कार्यक्रम मी घेतला होता फक्त दहा मिनिटे लेट झाले तर माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोक रात्रभर डीजे वाजवतात, तलवारीने केक कापतात आणि ही जर घटना खरी असेल तर आता नेमकी राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींकडे समाज एक आदर्श म्हणून पाहतो. बुलढाणा जिल्ह्याला जिजाऊंचा जिल्हा असा गौरवशाली वारसा मिळाला आहे. जिल्ह्यात सुसंस्कृत लोकप्रतिनिधी याआधी पाहायला मिळालेले आहेत. तो वारसा नवीन लोकप्रतिनिधींनी जपायला पाहिजे. महाराष्ट्राचा काय यूपी बिहार करायचा आहे का? नेमकी काय भूमिका घ्यायची ते आता ते मुख्यमंत्रीच आपल्याला सांगतील, असे शेळके म्हणाले.

आमदार संजय गायकवाड यांच्यावर शेतजमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर येथील रीटा उपाध्याय यांनी राजूर येथील दीड एकर शेतजमीन बळकावल्याचा आरोप संजय गायकवाड यांच्यावर केला आहे. या प्रकरणात गायकवाड यांच्यासह त्यांचे पुत्र मृत्युंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दीपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीकडेच आपणच वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यात घातल्याचे संजय गायकवाड यांनी स्वत: कबूल केले होते. त्यानुसार त्यांच्याविरोधात वन कायद्यानुसार गुन्हाही दाखल झाला आहे. हा दात वाघाचा असल्याचे उघड झाल्यास गायकवाड चांगलेच अडचणीत सापडणार आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT