Bhandara Paddy Scam Sarkarnama
विदर्भ

Bhandara Paddy : मुंढरीच्या संस्थेत धान घोटाळा; 13 संचालकांविरुद्ध गुन्हा

Major Scam : जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

अभिजीत घोरमारे

Police Action : शेतकऱ्यांकडून घेतलेले तब्बल 6 हजार 564 क्विंटल धान मिलर्सला न देता त्याची अफरातफर करून 1 कोटी 91 लाख रुपयांनी शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्याच्या मुंढरीत घडला आहे. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. करडी पोलिस ठाण्यात संस्थाध्यक्षांसह 13 संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

धान्याच्या घोटाळ्यासाठी भंडारा जिल्हा अधिक डागाळला जात आहे. माँ शारदा सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित मुंढरीचे अध्यक्ष अभिजीत एकनाथ चौरागडे, संचालक विलास मारुती शेंडे, नितेश सरोज शेंडे, उमेश रवींद्र मेश्राम, नीलेश विठ्ठल आस्वले, श्रीकांत श्रीकृष्ण देव्हारे, पवन धनराज राऊत, राकेश धनराज गोमासे, आशिष पांडुरंग शहारे, हितेंद्र नेत्राम बारेवार, गजेंद्र एकनाथ चौरागडे व दोन महिला संचालकांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खरीप व रब्बी हंगाम 2021-22 मध्ये प्रत्यक्षपणे या घोटाळेबाज संस्थेने परिसरातील शेतकऱ्यांकडून 25 हजार 482 क्विंटल धान खरेदी करण्यात आले. कालांतराने त्यापैकी शासनाच्या डीओ ऑर्डरप्रमाणे 18 हजार 917 क्विंटल धान मिलर्सला भरडाईसाठी देण्यात आले. मात्र उर्वरित 6 हजार 564. 46 क्विंटल धान मिलर्सला देण्यात आले नाही. वेळोवेळी जिल्हा पणन विभागाद्वारे मागणी करूनही धान मिलर्सला देण्यात आले नाही.

धानाची अफरातफर करून तब्बल 1 कोटी 92 लाख 2 हजार 578 रुपयांचा अपहार करण्यात आला. यासंदर्भात जिल्हा पणन अधिकारी सुधीर संभाजी पाटील (वय 44) यांनी तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात तपासाअंती संस्थाध्यक्षांसह संचालक मंडळांनी शासनाची करोडो रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. त्यामुळे करडी पोलिसात याबाबत रीतसर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पी. बी. पाटील करीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही वर्षांपासून एकामागे एक धानाचे घोटाळे उघड होत आहेत. 2021-22 मध्ये झालेल्या धान घोटाळ्यानंतर एकानंतर एक संबंधित संस्थेवर गुन्हे दाखल करण्यात आले. एकाच रात्री सहा लाखांपेक्षा जास्त धानाची खरेदी झाली होती. त्यानंतर ही सर्व प्रकरणे चव्हाट्यावर आली होती. चौकशीअंती संबंधित संस्था चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आता पुन्हा मुंढरी येथील शारदा सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेने 1 कोटी 91 लाखांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र भ्रष्टाचाराची कुरण बनत चालले आहे.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT